पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठीचं व्याज 15 जुलै पर्यंत जमा केलं जाईल असं सांगितलं.
EPFO : ईपीएफओकडून व्याज कधीपर्यंत मिळणार?
मनसूख मांडवीय म्हणाले की नव्या केंद्रीय आयटी प्लॅटफॉर्ममुळं व्याज वर्ग करण्याची प्रक्रिया वेगवान आणि ऑटोमेटिक बनली आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही. मांडवीय यांच्या माहितीनुसार यावेळी विक्रमी वेळात व्याजाचे पैसे पीएफ खात्यात पाठवले जाणार आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज दिलं जाणार आहे. देशभरातील जवळपास 34 कोटी एपीएफओ सबस्क्रायबर्सच्या खात्यात 1.44 लाख कोटी रुपये व्याज म्हणून जमा केली जाणार आहे.
यापूर्वी ईपीएफओकडून व्याज सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत खात्यात यायचं. मात्र, आता प्रक्रिया ऑटोमेटिक झाल्यानं व्याज वर्ग करण्याची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होणार आहे. 15 जुलै पर्यंत व्याजाची रक्कम खातेदारांच्या पासबूकमध्ये दिसण्यास सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं आहे.
ईपीएफओनं नवी सेंट्रलाइज्ड आयटी इनेब्लड सर्व्हिसेस प्रोजेक्टनुसार देशातील सर्व खातेदारांचं रेकॉर्ड सिंगल नॅशनल डेटाबेसमध्ये ट्रान्सफर केलं आहे. यापूर्वी ईपीएफओची सिस्टीम विकेंद्रीकृत होती. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचा डेटाबेस वेगळा होता. आता नवी यंत्रणा लागू झाल्यानं पीएफ खातं आता देशातील कोणत्याही अधिकृत ईपीएफओ कार्यालयातून प्रोसेस केलं जाईल.
अपडेशनमुळं पीएफ खातेदारांना काय फायदे होणार?
पीएफ खातेदाराची केवायसी पूर्ण असल्यास अॅडव्हान्स क्लेमची ऑटोसेटलमेंटची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आजारपण, लग्न किंवा इतर गरजांसाठी 5 लाखांपर्यंतचे क्लेम रक्कम ऑटो सेटल होऊ शकतात. नोकरी बदलल्यावर आधार लिंक्ड पीएफ खात्यातील पैसे नव्या कंपनीच्या नव्या खात्यात वर्ग केले जातील. क्लेम प्रोसेस अपडेट झाल्यानं क्लेम नाकारण्याचं प्रमाण कमी होईल. जर क्लेम मंजूर करताना काही अडचण असेल तर खातेदार ईपीएफओला ऑनलाईन उत्तर देऊ शकतात. पीएफ बॅलन्स, क्लेम स्टेटस आणि पेन्सन रेकॉर्डची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
दरम्यान, सिस्टीम अपग्रेडेशनसाठी ईपीएफओच्या वेबसाईट 26 जुलै पासून 28 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या वेळेत काम पूर्ण न होऊ शकल्यानं ते 2 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलं. 3 जुलैपासून ईपीएफओची यूनिफाईड मेंबर इंटरफेसची वेबसाईट सुरु झाली. मात्र, ईपीएफओ पासबुक वेबसाईट अद्याप सुरु झालेली नाही.
Comments are closed.