चार दशकांपासून पकड टाळून, आता माओवाद्यांच्या जाळ्यात.
असीम मंडलला एसटीएफकडून अटक : 1 कोटी रुपयांचे होते इनाम
वृत्तसंस्था/चाईबासा
झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सुमारे 4 दशकांपासून माओवादी कारवायांशी संबंधित असलेला भाकपचा (माओवादी) वरिष्ठ नेता असीम मंडल उर्फ आकाश उर्फ तिमिर उर्फ मनोज याला कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. त्याच्यावर सुरक्षा यंत्रणांकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर परिसरातून मंडलला अटक करण्यात आली. 64 वर्षीय माओवादी असीम मंडल हा पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील फुचलक गावचा रहिवासी आहे.
सारंडा जंगलात आश्रय
2011 साली माओवादी म्होरक्या किशनजीच्या मृत्युनंतर असीम मंडल जंगलमहल येथून पश्चिम सिंहभूममधील सारंडाच्या घनदाट जंगलात गेला आणि तेथून तो कारवाया करत होता. मात्र माओवादी कॅडरच्या वाढत्या आत्मसमर्पणामुळे सुरक्षा यंत्रणांचे त्याच्यावर लक्ष होते. ऑगस्टमध्ये आत्मसमर्पण केलेल्या काही माओवाद्यांच्या चौकशीत असीम मंडल पुन्हा जंगलमहलमध्ये पाय रोवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली होती.
बदलले ठिकाण
वाढते वय आणि प्रकृती खालावल्यामुळे माओवादी असीम मंडलने 13-14 ऑगस्टच्या सुमारास जंगलात एके-47 रायफल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सोडली होती. त्यानंतर तो कारने जंगली क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी रवाना झाला. परिचित अन् नातेवाईकांच्या ठिकाणी वेष बदलून आश्रय घेत असल्याचे चौकशीत आढळले. पुढील प्रवासासाठी पैसे घेण्याच्या उद्देशाने तो पोटाशपूर येथे एका परिचिताकडे पोहोचला असता कोलकाता एसटीएफने त्याला अटक केली आहे.
Comments are closed.