भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेची प्रचंड क्रेज! 50 हजारांहून अधिक तिकिट विक्री, 2019 नंतर पहिल्यांदाच…

भारतीय पुरुष क्रिकेट संघ यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.यामध्ये तिन्ही प्रकारचे सामने खेळले जाणार असून चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने याचा पुरावा दिला. त्यांनी सांगितले की, तिन्ही फॉरमॅटमधील या मालिकेसाठी आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
भारत तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. याची सुरूवात 22 ऑक्टोबरपासून होणार आहे. यामध्ये पाच टी20, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, विक्रीच्या पहिल्या आठवड्यात विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर, आतापर्यंत 50,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. दोन आठवड्यांच्या ‘प्री-सेल’ (पूर्व-विक्री) कालावधीनंतर सोमवारी सर्वसामान्यांसाठी तिकिटांची विक्री सुरू झाली. अनेक सामन्यांची तिकिटे पूर्णपणे विकली जाण्याच्या मार्गावर आहेत; यामध्ये क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या भारत विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्याचाही समावेश आहे, ज्याची 75% तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
“ईडन पार्कवर तिकिटांची मोठी मागणी असल्याने, 2019 मधील भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पहिल्यांदाच स्टेडियमचा सहावा टप्पा (tier) प्रेक्षकांसाठी खुला करावा लागला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी हा वरचा विभाग उपलब्ध असेल,” असेही निवेदनात पुढे म्हटले गेले आहे.
न्यूझीलंड क्रिकेटचे मार्केटिंग प्रमुख टिम एलिस म्हणाले, “भारतीय दौऱ्याचा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच ईडन पार्कचा सर्वात वरचा मजला उघडला गेला, हे खरोखरच रोमांचक आहे. यावरून या दौऱ्याबाबतचा उत्साह दिसून येतो.”
दौऱ्याचे वेळापत्रक पाहिले तर, टी20 मालिकेने दौऱ्याची सुरूवात होणार आहे. पहिला सामना 22 ऑक्टोबरला ख्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. तसेच मालिकेदरम्यान भारत अ संघ 24 ऑक्टोबरपासून ख्राईस्टचर्च येथेच न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांची चार दिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीसाठी उपयुक्त असेल.
टी20 मालिकेनंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच कसोटी मालिका 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. (Excitement Over India vs New Zealand Multi Match Series over 50000 Tickets Sold)
Comments are closed.