थलपथी विजय यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

काँग्रेसचे तामिळनाडूत 59 वर्षांनंतर दोन मंत्री

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूतील थलपती विजय यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. म्आधी 10 असलेली मंत्र्यांची संख्या आता 33 झाली आहे. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना विस्तारात स्थान देण्यात आले आहे. 1967 पासून प्रथमच काँग्रेसला तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची संधी मिळाली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नव्या मंत्र्यांना बुधवारी शपथ दिली आहे.

गुरुवारच्या विस्तारात 23 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांपैकी 21 जण थलपती विजय यांच्या टीव्हीके या पक्षाचे आहेत. तर दोन मंत्री काँग्रेसचे आहेत. अद्यापही या मंत्रिमंडळात युतीतील सर्व पक्षांचा समावेश करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्रीही बदलला आहे. आता हा विभाग मेरी विल्सन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर आधीचे अर्थमंत्री के. ए. सेनगोट्टाईयान यांच्याकडे आता केवळ महसूल विभाग ठेवण्यात आला आहे.

विभाग वितरण नंतर

नव्या मंत्र्यांना विभागांचे वितरण काही दिवसांनी करण्यात येणार आहे. सध्या मुख्यमंत्री थलपती विजय यांनी स्वत:कडे महत्त्वाचा गृहविभाग ठेवला असून सामान्य प्रशासन आणि पाणीपुरवठा हे विभागही स्वत:कडेच राखले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात चार महिला मंत्र्यांनाही स्थान देण्यात आले. जातीय समीकरणांचा विचारही मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

जास्तीत जास्त 35 मंत्री

कायद्यानुसार तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 35 मंत्री असू शकतात. सध्या मंत्र्यांची संख्या 33 आहे. त्यामुळे भविष्यकाळात मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असल्यास केवळ दोन स्थाने उपलब्ध आहेत. विजय यांनी अद्यापही मुस्लीम लीग किंवा डाव्या पक्षांच्या सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही. आता केवळ दोन स्थाने उरल्याने या पक्षांच्या वाट्याला फारशी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता दुरावली आहे, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.

‘वंदे मातरम्’वरून टीका

नव्या मंत्र्यांना शपथ देण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीत किंवा तामिळनाडू गीताच्याही आधी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानापासून करण्यात आला. केंद्र सरकारने तसा नियम नुकताच केला आहे. या नियमाचे पालन या कार्यक्रमात करण्यात आले आहे. तथापि, यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने जोरदार टीका केली आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताचे गायन आधी करू देऊन विजय हे भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम पुढे चालवित आहेत. त्यांनी तसे करणे अयोग्य आहे, अशी मल्लिनाथी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे.

Comments are closed.