तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
16 जणांचा होरपळून मृत्यू : विरुधुनगर जिल्ह्यातील घटना, अन्य 6 जण जखमी
वृत्तसंस्था/ विरुधुनगर
तामिळनाडूतील विरुधुनगर जिह्यातील कट्टनारपट्टी परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच जिह्यातील एका कारखान्यात काही दिवसांपूर्वीच घडलेल्या स्फोटानंतर दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.
फटाके कारखान्यातील स्फोटात इमारतीचा बहुतांश भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी सायंकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून अनेक मृतदेह बाहेर काढले होते. हा शक्तिशाली स्फोट विरुधुनगरजवळील कट्टनारपट्टी येथे झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली इतर अनेक जण अडकल्याची भीती आहे. स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने इतर चार युनिट्सनाही वेगाने वेढले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. स्फोटामुळे जवळच्या इमारतींचेही नुकसान झाले.
घटनास्थळी विदारक परिस्थिती
कामगार काम करत असताना कारखान्यात स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. आग वेगाने पसरली आणि अनेक लोक आत अडकले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास प्रारंभ केला. तसेच बचावकार्य सुरू केले. मात्र, स्फोटामुळे अनेक कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अग्निशमन आणि बचाव विभागाच्या मदतीने अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित पीडितांचा शोध सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील करून स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून निर्देश
राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला. या कठीण काळात सरकार मृतांच्या कटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी प्रशासनाला मदत आणि साहाय्य कार्याला गती देण्याचे निर्देशही दिले. त्यांनी मंत्री रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासू यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना केल्या. त्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आवश्यक मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनाही शोक
राष्ट्रपतींनीही या अपघाताला अत्यंत दु:खद असे संबोधले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करताना हा अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करतानाच जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.
Comments are closed.