चंदीगड विमानतळावर विमानात स्फोट
प्रवाशाकडील पॉवर बँकमध्ये विस्फोट : अनेक प्रवासी जखमी
वृत्तसंस्था/ चंदीगड
हैदराबाद येथून चंदीगडच्या दिशेने येत असलेल्या इंडिगोच्या विमानात लँडिंगदरम्यान मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. विमानातील एका प्रवाशाच्या मोबाइल पॉवर बँकमध्ये विस्फोट झाला. या दुर्घटनेत 5 प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शहीद भगत सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी घडली आहे.
विमानात 39-एफ सीटवर बसलेल्या देवांश नावाच्या इसमाच्या पॉवर बँकमध्ये लँडिंगदरम्यान अचानक आग लागली, त्याने याची माहिती व्रू सदस्यां दिली. परंतु काही वेळातच पॉवर बँकमध्ये विस्फोट होत विमानात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
पॉवर बँकमधील विस्फोटानंतर विमानात पळापळ सुरू झाली. यादरम्यान इमर्जन्सी गेट खुले झाले आणि तेथून काही प्रवासी खाली उतरू लागले. यादरम्यान झालेल्या गोंधळात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जीरकपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेप्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे.
लँडिंगदरम्यान संबंधित प्रवासी मोबाइल हाताळत होता, तसेच त्याला पॉवर बँक जोडलेली होती असे विमानातील प्रवाशांनी सांगितले. लँडिंगवेळी कुठलाही व्यक्ती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी क्रू सदस्यांची असते. विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवर असताना ही दुर्घटना घडली, परंतु हाच प्रकार लँडिंगपूर्वी विमान आकाशात असताना घडला असता तर मोठे नुकसान झाले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
Comments are closed.