'आकाश'ची आर्मेनिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तानला निर्यात

भारताच्या सरंक्षण निर्यातीत होतेय वाढ : आकाश हवाई सुरक्षा प्रणालीला मोठी मागणी

भारताने आकाश हवाई सुरक्षा प्रणाली आर्मेनिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांना यशस्वीपणे पुरविली आहे. या संरक्षण प्रणालीची निर्मिती पूर्णपणे भारतात करण्यात आली आहे. तर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची एकूण निर्यात 600 दशलक्ष डॉलर्सचा आकडा पार करणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीच्या पुरवठ्यासाठी दक्षिणपूर्व आशियातील तीन देशांसोबत करार झाले आहेत, ज्यात फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम सामील असल्याची माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आकाश हवाई सुरक्षा प्रणालीचा पहिला ग्राहक आर्मेनिया हा देश होता, या देशाने या प्रणालीच्या अनेक बॅटऱ्या प्राप्त केल्या आहेत, त्यानंतर ही प्रणाली ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानलाही निर्यात करण्यात आली आहे. आमच्याकडे भारतीय सैन्यासाठी देखील ऑर्डर आहे आणि जगाच्या विविध हिस्स्यांमधून आणखी ऑर्डर्स मिळतील असा विश्वास आहे. आकाश सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र प्रणाली ही संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे उद्गार राजेश कुमार सिंह यांनी काढले आहेत.

भारतीय सशस्त्र दलांसाठी खरेदी जारी

आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे उत्पादन स्थिर झाले आहे. भारतीय सशस्त्र दलांसाठी खरेदी जारी आहे आणि अन्य देशांमधूनही ऑर्डर वाढत असल्याचे संरक्षण सचिवांनी सांगितले. संरक्षण निर्यातीत भारताच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपेकी एक कमी खर्चाचा फायदा होत आहे. पुढील दोन वर्षांमध्ये संरक्षण निर्यात 50 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा असल्याचे संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते.

राफेल-तेजसचा ताळमेळ जबरदस्त

याचदरम्यान फ्रेंच एअर डिफेन्सचे डेप्युटी कमांडर ज्युलिन सबेने यांनी भारतीय लढाऊ विमान तेजसचे कौतुक केले आहे. आकाशात राफेलसोबत तेजसचा ताळमेळ जबरदस्त आहे. तेजस विमानाने फ्रान्सच्या ‘मिराज 2000’ या विमानाची आठवण करून दिली आहे. तेजस भारतीय क्षमता आणि सार्वभौमत्वासाठी मोठे पाऊल आहे असे उद्गार सबेने यांनी काढले आहेत. सबेने यांनी राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायुदलाकडून आयोजित बहुराष्ट्रीय सराव ‘तरंग शक्ती’मध्ये भाग घेतला आहे.

Comments are closed.