पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा औपचारिक राजीनामा सादर केला आहे. पंजाब काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांवर चर्चा सुरू असतानाच त्यांनी हा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष सध्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवर विचारविनिमय सुरू आहे. एप्रिल 2022 मध्ये पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यापासून जवळपास साडेचार वर्षे हे पद भूषवले.
राहुल गांधी यांच्या भेटीप्रसंगी वारिंग यांनी राज्यातील विविध परिस्थितीबाबत सविस्तर चर्चाही केली. पक्षनेते राहुल गांधी यांना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा साडेचार वर्षांचा अनुभव सांगितला, अशी माहिती वारिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पक्षासमोरील आव्हाने, त्यांचा सामना कसा करायचा आणि आपली बलस्थाने कोणती आहेत हे मी नेत्यांना समजावून सांगितले. आम्ही या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली, असे ते पुढे म्हणाले. काँग्रेस पक्षासोबतचा त्यांचा संबंध कायम राहील आणि पक्षाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते उपलब्ध असतील, असा शब्दही त्यांनी दिला आहे.
Comments are closed.