Ratnagiri News – देवगड हापूसच्या नावाखाली ‘खोट्या’ आंब्यांची विक्री; बागायतदार संतप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध समस्यांनी होरपळून निघत असताना आता देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक ठिकाणी देवगड हापूस म्हणून परराज्यातील आंबे विकले जात असल्याच्या तक्रारी आंबा-काजू बागायतदार व्यापारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर संघटनेने अचानक धाडसत्र राबवत संबंधित विक्री केंद्रांवर पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी कर्नाटकातून आणलेले आंबे देवगड हापूसच्या नावाने विक्रीस ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार उघडकीस येताच बागायतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली.

एकीकडे नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. देवगड हापूसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली. मात्र काही व्यापाऱ्यांकडून केवळ नफ्यासाठी खोट्या नावाखाली आंब्यांची विक्री करून देवगड हापूसच्या प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचवला जात असल्याची भावना बागायतदारांनी व्यक्त केली.

संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करत, “देवगड हापूस हा सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि विश्वासाचा ब्रँड आहे. परराज्यातील आंबे देवगड हापूस म्हणून विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अन्यथा संघटना अधिक तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा दिला. दरम्यान, या प्रकारामुळे खरी ओळख असलेल्या देवगड हापूसच्या बाजारपेठेवर परिणाम होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर,गणेश वाळके, प्रशांत शिंदे, शरद परब, नीरज घाडी,मयूर वाळके,सचिन लोके, तेजस मामघाडी, अजय तेली, स्वप्नील तोडणकर,बंटी गावकर आधी आंबा बागायतदार उपस्थित होते

Comments are closed.