परभणीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांमध्ये हाणामारी; दोन गटांचा एकमेकांवर प्लॅस्टिकचे ड्रम, कॅन घेऊन हल्ला

सरकारने राज्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचे कितीही दावे केले असले तरी पेट्रोल पंपांवरील हाणामारी थांबलेली नाही. आज परभणीच्या एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगेत उभे राहण्यावरून शेतकऱ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर प्लॅस्टिकचे ड्रम आणि पॅन घेऊन हल्ला चढवला. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परभणीच्या मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली. रांगेतील नंबरवरून शेतकऱ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. डिझेल खरेदीसाठी आणलेले प्लॅस्टिकचे ड्रम आणि पॅन त्यांनी एकमेकांना फेकून मारले. या घटनेमुळे काही काळ इंधन विक्री थांबवण्यात आली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली आणि इंधन विक्री सुरू केली.

जळगाव शहरामध्येही पेट्रोल पंपांवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अखेर जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांना स्वतः भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी अनेक पंपांवर डिझेल विक्रीच्या ठिकाणी स्वतः उभे राहिले. काही पंपांवर पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेल वाटप करण्यात आले.

वाळू माफियांना गुपचूपपणे इंधन विक्री

पेरणी आणि शेतीकामाचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता असते. त्यामुळेच पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहे. वाळू माफियांना मात्र पंपचालक गुपचूपपणे इंधन विक्री करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात डिझेल दिले जात आहे; परंतु वाळू माफियांना मात्र कोणतीही मर्यादा नाही असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यादिशेने प्रशासनाकडून पंपचालकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • बुलढाण्यात पेट्रोल पंपांवर वाहने आणि ट्रक्टरच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल पंपचालक, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद होत असल्याच्या घटना घडत आहे. ते वाद टाळण्यासाठी मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे येथील पंपचालकाने ग्राहकांना कूपन वाटप सुरू केले आहे. कूपन दाखवल्याशिवाय कुणालाही इंधन मिळत नाही. रोज अशी 200 कूपन्स वाटली जात असल्याने पंपावरील गर्दीही नियंत्रणात आली आहे व प्रत्येक ग्राहकाला इंधनही मिळाल्याने ते समाधानी आहेत.

राज्यात इंधनसाठा मुबलक, शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – कृषिमंत्री भरणे यांचे आवाहन

इंधन तुटवडय़ाची चर्चा, पेट्रोल पंपांवर लागणाऱया रांगा आणि त्यातून घडणाऱ्या अनुचित घटना या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महत्त्वपूर्ण विधान केले. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असून शेतकऱयांनी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृषिमंत्री भरणे यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवून राज्यात धो धो पाऊस पडू दे असे साकडे पांडुरंगाला घातले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी इंधन तुटवडय़ाबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, इंधन तुटवड्याच्या भीतीने पेट्रोल पंपांवर झुंबड उडाली आहे, शेतकरी मोठय़ा प्रमाणात डिझेल खरेदी करुन साठा करत आहेत, अशी विनाकारण साठवणूक करू नका.

‘हेच का भाजपचे अच्छे दिन’ – वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. परभणीच्या मानवतमध्ये डिझेलसाठी नागरिकांमध्ये हाणामारी होण्याची वेळ यावी, हेच का भाजपचे अच्छे दिन, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

एका बाजूला सामान्य माणूस भरउन्हात हातातील काम सोडून थेंब-थेंब इंधनासाठी तासन्तास रांगेत उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार फक्त इव्हेंटबाजी आणि जाहिरातींमध्ये मग्न आहे! जनतेच्या संयमाचा बांध आता फुटतोय. सत्ताधाऱ्यांनो, अजून किती दिवस सत्य परिस्थिती नाकारणार? असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात इंधन तुटवडा नसल्याचे कितीही खोटं बोलत असले तरी महाराष्ट्रातील चित्र इंधनटंचाईची सत्य परिस्थिती सांगणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता! – रोहित पवार

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱयालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधनटंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण येते, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

Comments are closed.