मान्सूनची वेगाने आगेकूच, मुंबईत सरी, दोन दिवसांत केरळात; 6 जूनपर्यंत महाराष्ट्रात धडकणार
मे महिना संपण्याआधीच मान्सून प्रचंड वेगाने आगेकूच करू लागला आहे. पुढील दोन दिवसांतच मान्सून केरळात दाखल होईल. सध्याची सक्रियता आणि गती लक्षात घेता महाराष्ट्रात वेळेआधीच म्हणजेच 6 जूनपर्यंत कोकणात मान्सूनची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवला. मान्सूनच्या प्रवासात कोणताही अडथळा दिसत नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा प्रभाव वातावरणावर होऊन मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा सुरुवातीचा टप्पा असलेल्या बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाही. मान्सूनचा प्रवास विनाअडथळा सुरू असल्याने त्याने वेगाने आगेकूच केली आहे. हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या वेळेआधीच ‘एण्ट्री’चे भाकीत केले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 5 जूनला गोव्यात, 6 जून रोजी कोकणात आणि 7 जूनला पुणे-मुंबईत हजेरी लावेल. सामान्यतः 1 जूनच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. यंदा पुढील दोन दिवसांत म्हणजेच 26 मेपर्यंत मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकेल, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पाच दिवस विश्रांती घेत मान्सून पुन्हा सक्रिय
मान्सूनने पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सक्रिय वाटचाल सुरू केली आहे. 18 मे रोजी संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, श्रीलंकेचा काही भाग व कोमोरीन भागात मान्सून पोहोचला होता. नंतर पुढचे पाच दिवस त्याचा वेग मंदावला होता. आता वेगाने पुढे सरकत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा पिकांचे नुकसान
रविवारी मुंबईप्रमाणेच कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने हवेत गारवा निर्माण केला, पण पावसात आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. राजापूर, लांजा, संगमेश्वर भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. याव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांना मान्सूनपूर्व पावसाचा मोठा तडाखा बसला. सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी जिह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा शेतपिकांना फटका बसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
- प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झालेले असतानाच आज सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारपासून ढगाळ वातावरण होते. त्या वातावरणाने हवेतील आर्द्रता आणि पर्यायाने उकाड्यात मोठी वाढ झाली होती. त्यात पावसाच्या हजेरीने सकाळी थोडा दिलासा दिला.
Comments are closed.