मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा माढ्यात विराट मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. माढा आणि पंढरपूर तालुक्यात या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत माढा तहसील कार्यालयावर एक मोठा मोर्चा काढला. यावेळी शेतकरी नेते संजय पाटील घाटणेकर यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

“आमच्या कष्टाच्या फळबागा आणि द्राक्षबागा उद्ध्वस्त करून जर हा महामार्ग जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल. सरकारने आमचे ऐकले नाही, तर येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊलही ठेवू देणार नाही आणि त्यांना शासकीय महापूजा करू देणार नाही,” असा थेट आणि गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

करकंबमध्ये अधिकाऱ्यांना पाठवले माघारी

दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी काही सरकारी अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह आले होते. मात्र याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला.

शेतकऱ्यांनी अधिकारी आणि पोलिसांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा वाढता संताप पाहून प्रशासनाला मोजणीचे काम थांबवावे लागले. अखेर कोणत्याही कारवाईशिवाय अधिकाऱ्यांना तेथून रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.

Comments are closed.