एफडीएची मुंबईतील आठ आस्थापनांवर धडक कारवाई, पाच परवाने निलंबित
अस्वच्छता आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्याचा ठपका ठेवत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील आठ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत एफडीएने पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले असून तीन आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
एफडीएने कारवाईवेळी सांताक्रुझ (पूर्व) येथील ‘कॅफे सुलतान’, अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील ‘लो फ्रेश फूड प्रा. लिमिटेड’, अंधेरी (पश्चिम) येथील ‘कंट्री क्लब’ व ‘सूरज लामा मोमोस’, सांताक्रुझ (पश्चिम) येथील कॅफे पाकिझा या पाच आस्थापनांमध्ये त्रुटी आढळल्या. त्यामुळे एफडीएने त्यांचे अन्न परवाना निलंबित केले आहेत.
या आस्थापनांचे परवाने रद्द
तपासणीदरम्यान एफडीएच्या अन्न व्यवसायाशी संबंधित परवाना अटी, अन्न सुरक्षा, अस्वच्छता, दूषित अन्न, तरतुदींचे पालन होत नसल्याचे आढळले. तसेच अन्न व्यवसाय सुरक्षित पद्धतीने चालविण्यासाठी आवश्यक बाबींचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनात आले. त्यानुसार एफडीएने विलेपार्ले येथील एस. व्ही. रोडवरील ‘ब्लिंकिट’ व ‘कोपेनहेगन हॉस्पिटॅलिटी’ आणि वांद्रे पश्चिम येथील ‘इटक्लब’ या आस्थापनांचा अन्न परवाना रद्द केला आहे.
Comments are closed.