पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलवर एफडीएचा बडगा; वायसीएम रुग्णालयातून १.७२ कोटींचा साठा जप्त, धक्कादायक माहिती समोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील औषध उत्पादक कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. इंडुकेअर फार्मास्युटिकल या कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. परवानगीशिवाय नऊ औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचा गंभीर प्रकार तपासात उघड झाला आहे. कंपनीची ही नऊही औषधे अप्रमाणित आणि बनावट असल्याची माहिती समोर आली आहे

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे. सुरुवातीला हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर आता एफडीएने औषध उत्पादक कंपन्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीवर करण्यात आलेली कारवाई याचाच एक भाग आहे. कंपनीने आवश्यक परवानगी न घेता नऊ औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे तपासात समोर आले. या औषधांची गुणवत्ता आणि वैधतेबाबतही गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून (वायसीएम) इंडुकेअरचा तब्बल १ कोटी ७२ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीवर यापूर्वीही एफडीएने कारवाई केली होती. सप्टेंबर २०२६ मध्ये तपासणीदरम्यान कंपनीत २५ गंभीर त्रुटी आढळल्याने औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीच्या कामकाजावर एफडीएने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.