एसटीच्या NCMC कार्ड रिचार्जची ‘ती’ अट रद्द; आता अवघ्या 5 रुपयांच्या पटीत टॉप-अप शक्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी महामंडळाच्या महिला, सवलतधारक प्रवाशांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) रिचार्ज करण्याच्या नियमांमध्ये महामंडळाने मोठा बदल केला आहे. यापुढे प्रवाशांना किमान ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याऐवजी आता अवघ्या ५ रुपयांच्या पटीतही कार्ड टॉप-अप करता येणार आहे. तसेच रिचार्जवर आकारले जाणारे अतिरिक्त कमिशनही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण प्रवाशांची मोठी अडचण दूर

महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र पूर्वी या कार्डमध्ये किमान ५० रुपयांच्या पटीतच रक्कम भरावी लागत होती. ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास नियमित नसतो, अशा वेळी ५० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कार्डमध्ये टाकल्यास ती विनावापर अडकून पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. हीच गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने नियमात शिथिलता आणली आहे. आता प्रवासी आपल्या गरजेनुसार ५, १०, १५ किंवा २० रुपये असे छोटे रिचार्ज करू शकतील.

रिचार्जवरील कमिशन बंद, प्रवाशांना आर्थिक दिलासा

कार्ड रिचार्ज करताना यापूर्वी प्रवाशांच्या खात्यातून ११ रुपये ८० पैसे इतके कमिशन कापले जात होते. या छुप्या कपातीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रवाशांचा हा रोष लक्षात घेता महामंडळाने हे कमिशन पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाचणार असून, केवळ व्यवहारावर लागू असणारा नियमानुसार करच आकारला जाणार आहे.

कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम संधी

सुरुवातीला १ ऑक्टोबर २०२६ पासून हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र अद्यापही अनेक लाभार्थी प्रवाशांकडे हे कार्ड नसल्याने महामंडळाने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Comments are closed.