स्त्रियांच्या हत्येचा सण

होळी साजरी करण्याची प्रत्येक गावची एक भिन्न तऱ्हा आहे. होळी हा सण उत्तर भारतात सर्वत्र अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात असणाऱ्या चुल्हावली गावात हा सण अशा पद्धतीने साजरा केला जातो, की तो भारतात कोठेही तसा साजरा होत नसावा. या गावात या दिवशी पुरुष महिलांकडून येथेच्छ मार खातात. इतकेच नव्हे. तर ते अधिकाधिक मार खाण्यासाठी उतावळे झालेले असतात. कारण जो पुरुष होळीच्या दिवशी महिलांकडून सर्वाधिक मार खाईल, त्याचा सत्कार केला जातो. होलिका दहनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी हा ‘मार खाण्या‘चा सोहळा असतो. या दिवशी महिला नव्या साड्या परिधान करुन आणि नटून थटून सज्ज होतात. त्यांच्या हातात ‘पैना नामक ‘शस्त्र असते. अर्थातच, ते धारदार नसते. एका बांबूच्या काठीच्या एका टोकाला चामड्याचा एक पातळ पट्टा बांधून हे साधन निर्माण केलेले असते. पुरुषही मार खाण्यासाठी नवी वेषभूषा करुनच आलेले असताना. सज्ज झालेले स्त्रीपुरुष एकत्र जमले की या सोहळ्याचा प्रारंभ केला जातो. प्रथम हास्य विनोद होतात. नंतर महिलांच्या हातून मार खाण्याचा कार्यक्रम होतो. महिला हातातील पैनाने पुरुषांना येथेच्छ झोडपून काढतात. पुरुषांना उलटून महिलांना मारण्याची किंवा प्रतिकार करण्याची अनुमती नसते. त्यामुळे या दिवशी तरी महिलांना मोकळे रान मिळते. पुरुष मार खात राहतात. ते इच्छा असल्यास मार चुकवू शकतात पण उलटून मारु शकत नाहीत. ही परंपरा सहस्रावधी वर्षांपासून आहे, असे गावातील वयोवृद्ध लोकांचे म्हणणे आहे. ब्रज, वृंदावन, बरसाना आणि बलदेव येथील सुप्रसिद्ध ‘कोडामार किंवा ‘लठ्ठामार’ होळीप्रमाणेच ही ‘पैनामार होळी आहे. ही सर्व स्थाने भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत. अशा प्रकारे ही होळी अत्यंत अद्भूत प्रकारे या सर्व भागांमध्ये साजरी केली जात आहे.

Comments are closed.