फुटबॉलवर पैशांचा पाऊस, फिफा वर्ल्ड कपमध्ये 8,386 कोटींची उधळण; विजेत्या संघाला 481 कोटी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फुटबॉलला जगातील सर्वात लोकप्रिय खेळ का म्हणतात, याचं उत्तर फिफाने यंदाच्या बक्षीस रकमेतून दिले आहे. वर्ल्ड कपमध्ये यंदा तब्बल 8,386 कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पडणार आहे. ही रक्कम इतकी प्रचंड आहे की, ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक, रग्बी विश्वचषक, हॉकी विश्वचषक आणि बॅडमिंटनच्या बहुतांश जागतिक स्पर्धांची एकत्रित बक्षीस रक्कमही तिच्यापुढे लहान वाटते. त्यामुळे वर्ल्ड कप हा केवळ जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सवच नाही, तर सर्वाधिक श्रीमंत स्पर्धाही ठरला आहे.

रविवारी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणारी अंतिम लढत केवळ ट्रॉफीसाठी नाही, तर 481 कोटी रुपयांच्या सुवर्णवर्षावासाठीही असणार आहे. विजेत्या संघाला 50 दशलक्ष डॉलर (सुमारे 481 कोटी रुपये) मिळणार आहेत. पात्रता शुल्क आणि तयारीसाठी मिळालेली आर्थिक मदत धरल्यास ही कमाई 578 कोटी रुपयांहून अधिक होणार आहे. म्हणजे एखाद्या आयपीएल फ्रँचायझीच्या एका हंगामातील उत्पन्नालाही मागे टाकणारी ही रक्कम आहे.  2022 च्या कतार वर्ल्ड कपमध्ये फिफाने 4,236 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते. यंदा ही रक्कम थेट 8,386 कोटींवर पोहोचली आहे. अवघ्या चार वर्षांत तब्बल 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतर खेळांमध्ये अशी झेप क्वचितच पाहायला मिळते. क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वचषकातील विजेत्या संघाला मिळणारी रक्कम याच्या तुलनेत खूपच कमी आहे.

हॉकी विश्वचषक, कबड्डी विश्वचषक, बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा अॅथलेटिक्समधील जागतिक स्पर्धांमध्ये खेळाडू प्रतिष्ठsसाठी लढतात; पण फुटबॉलमध्ये प्रतिष्ठेबरोबर पैशांचाही अक्षरशः महापूर वाहतो. म्हणूनच फिफा वर्ल्ड कप हा क्रीडा स्पर्धांचा आर्थिक महासागर मानला जातो.  यंदाच्या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे एकही संघ रिकाम्या हाताने परतणार नाही. सहभागी झालेल्या प्रत्येक 48 संघांना किमान 120 कोटी रुपये मिळणार आहेत. केवळ पात्रता आणि तयारीसाठीच फिफा 96 कोटी रुपये देते, तर उर्वरित 24 कोटी रुपये स्पर्धेच्या खर्चासाठी दिले जातात. त्यानंतर प्रत्येक फेरी गाठताना पुरस्काराच्या रकमेत कोटय़वधी रुपयांची भर पडत जाते.

तिसऱया स्थानाच्या सामन्यात फ्रान्सला हरवणाऱया इंग्लंडने केवळ कांस्यपदकच जिंकले नाही, तर 279 कोटी रुपयांचा धनवर्षावही आपल्या खात्यात जमा केला. पराभूत फ्रान्सलाही 260 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजे ब्राँझ पदकासाठीच्या एका विजयाची किंमत तब्बल 19 कोटी रुपये ठरली. अंतिम सामन्यातही पैशांचा संघर्ष कमी रंगणार नाही. विजेत्या संघाला 481 कोटी रुपये, तर उपविजेत्याला 318 कोटी रुपये मिळतील. म्हणजे ट्रॉफी उंचावणाऱया संघाला प्रतिस्पर्ध्यापेक्षा 163 कोटी रुपये अधिक मिळणार आहेत. हा फरक अनेक देशांच्या वार्षिक क्रीडा अर्थसंकल्पाइतकाच आहे.

Comments are closed.