ठिणगी पडली! मोदी, झोला घेऊन निघायची वेळ झाली!! तरुणाईचा अणुबॉम्ब सरकारच्या बुडाखाली लागलाय – उद्धव ठाकरे
भारतीय जनता पक्षाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आज महाराष्ट्रात ठिणगी पडली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या लढय़ात महाराष्ट्र एकजुटीने उतरला. भारतमाता की जय… अशा गगनभेदी घोषणा देत शिवतीर्थावर जेन झींचे वादळ उसळले. सरकारच्या दडपशाहीविरुद्ध उठलेल्या तरुणाईच्या या आवाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोला घेऊन निघायची वेळ झाली असल्याचेच संकेत दिले. तरुणाईचा अणुबॉम्ब सरकारच्या बुडाखाली लागलाय, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशव्यापी आंदोलनाचा शंखनाद केला. तरुणाईची ही एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेशी आहे, ही जाग आणि आग मोदी सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे, या आगीत सरकार जळून भस्म झाले पाहिजे, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवतीर्थावरील या आंदोलनासाठी तरुण-तरुणींची तुडुंब गर्दी झाली होती. सर्वांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ काळे टी-शर्ट परिधान केले होते. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित तरुणांनी भारतमाता की जय… वंदे मातरम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा जोरदार घोषणा दिल्या. आज नेतृत्व करायला नाही तर तुम्ही सर्वांनी नेते व्हा असे सांगण्यासाठी आलोय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तरुणांना संबोधित केले.
सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडण्यासाठी भाजप सरकारने दिल्लीच्या जंतरमंतरचा परिसर पोलीस छावणीच बनला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले की, भाजप सरकारने देशाचे भवितव्यच चोरलेय. जंतरमंतरवर सरकार सैन्य आणतेय, फौजा आणतेय, कदाचित अणुबॉम्बही आणतील, पण देशातील तरुणाईचा अणुबॉम्ब आधीच या सरकारच्या बुडाखाली लागला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशासाठी जगणारा माणूस देशद्रोही कसा?
वांगचुक यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रामुख्याने उल्लेख केला. देशाच्या रक्षणासाठी सरहद्दीवर शून्य डिग्री तापमानात आपले जवान उभे राहतात. त्या जवानांसाठी वांगचुक यांनी सोलार टेन्ट बनवले. ती व्यक्ती भाजप सरकारसाठी देशद्रोही ठरते? सीमेवरील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन वांगचुक यांनी सैनिकांसाठी आईस फाऊंटन तयार केले. मेलो तरी बेहत्तर, पण माझी भारतमाता जगली पाहिजे अशा भावनेने देशासाठी जगणारा असा हा पर्यावरणवादी शास्त्रज्ञ भाजप सरकारला देशद्रोही वाटतो, मग नेमके देशप्रेम कुठे आहे? असा सवाल करतानाच, भाजप सरकार केवळ अदानी आणि उद्योगपतींचे प्रेमी आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहेच, पण कट्टर देशाभिमानीसुद्धा आहे. केवळ धर्माच्या नावावर शेंडी जानव्याचे शिवसेनेचे हिंदुत्व नाही. आज जे देशात चाललेय ते संघाच्या कल्पनेतल्या हिंदूराष्ट्रात बसतेय का? असे असेल तर हे हिंदू राष्ट्र शिवसेनेला अपेक्षित नाही. शिवसेनेच्या हिंदूराष्ट्रात देशभक्ती महत्त्वाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
संघाला पाकिस्तानशी चर्चा हवी, मग वांगचुकशी का नको?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी दत्तात्रय होसबळे यांनी हिंदुस्थानने पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य मे महिन्यात केले होते. जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्पह्ट करतोय, अतिरेकी हल्ले करतोय त्याच्याशी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत असे होसबळे म्हणतात. सरसंघचालक मोहन भागवत हेसुद्धा त्याला दुजोरा देतात आणि आम्ही हिटलरसारखे नाही, असे म्हणतात. मग हे त्यांनी वांगचुक यांच्याशी चर्चा न करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले पाहिजे, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. पाकिस्तानबरोबर चर्चेची तयारी आहे मग वांगचुक यांच्याशी का नको? असा संतप्त सवालही त्यांनी केला. वांगचुक यांच्या बुद्धिमत्तेचा देशासाठी वापर करून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
अण्णा हजारेंसाठी दूत पाठवला, वांगचुक यांच्यासाठी का नाही?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण अण्णांना कुणी देशद्रोही, चीनचा हेर किंवा हस्तक असे म्हटले नव्हते. अण्णांचे म्हणणे काय हे विचारण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने चौथ्या-पाचव्या दिवशी विलासराव देशमुख यांना पाठवले होते. अण्णांसाठी दूत पाठवला होता तसा मोदी सरकारने का पाठवला नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत उचलून पोलिसांनी रुग्णालयात नेले. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अरे काय अतिरेक्याला उचलताय तुम्ही? वांगचुक यांना चादरीत झाकले तरी मोदी सरकार सत्य झाकू शकत नाही. कितीही झाका, ते लपणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धर्मेंद्र प्रधानांना डोक्यावर घेऊन नाचवताय, सोने लागलेय का?
पंतप्रधान मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी सडकून टीका केली. मोदींच्या स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही आणि शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे त्यांना माहीत नाही, अभ्यास माहीत नाही. त्यामुळे परीक्षेला जाताना पेपर फुटला की काय यातना होतात हे त्यांना कसे कळणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकारची घोषणा आहे… मुलगी शिकली प्रगती झाली. अरे, पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला तर ती मुलगी किंवा मुलगा आत्महत्या करणार नाही का? एवढय़ा मुलांनी आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान डोक्यावर घेऊन नाचताय? त्याला काय एवढे सोने लागलेय? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गल्लीगल्लीत मोदी सरकारच्या नावे ‘शोर’ करा
वांगचुक यांच्या वडिलांनीही उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान आणि भाजपच्या लेखी हुकूमशहा असलेल्या इंदिरा गांधी लडाखला गेल्या होत्या. दिल्लीत राहून वांगचुक यांना भेटायला न जाणारे मोदी आणि शहा म्हणजे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकूमशहा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थित तरुणांनी ‘नरेंद्र मोदी हाय हाय…’, ‘गली गली मे शोर है, नरेंद्र मोदी चोर है’, अशा घोषणा दिल्या. त्यावर तुम्ही ज्या गल्लीतून, ज्या गावातून आला असाल त्या गल्लीगल्लीत तुम्हाला हा शोर करावा लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
भाडखाऊन माणसे चोरली म्हणून भाजप झुरळाला घाबरतो
आपल्या घरात असे मानले जाते की साधी महिलाही झुरळाला घाबरते, पण इथे आमचे पंतप्रधानच झुरळाला घाबरतात. अख्खे सरकार घाबरते. भाडखाऊन इतर पक्षांतील माणसे चोरली म्हणून हे सत्ताधारी झुरळाला घाबरतात. कारण त्यांच्या पक्षात सर्व चोरून आणलेले गद्दार भरले आहेत, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हिंमत असेल तर आता घ्या निवडणूक, आम्ही तयार आहोत…
मोदी सरकारला वन नेशन, वन इलेक्शन घ्यायचेय. हिंमत असेल तर आता जाहीर करा देशाची निवडणूक, आम्ही तयार आहोत, असे जाहीर आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. नेशन म्हणजे काय असते, राष्ट्र म्हणजे काय असते, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱयांना दाखवून देण्याची वेळ आणि संधी आली आहे, असे त्यांनी उपस्थित तरुणाईला सांगितले.
तरुणांना झुरळ म्हणतात, मग त्यांचे आईवडीलही झुरळच होतात. हा देश काय झुरळांचा आहे का? जे आपल्याला झुरळ म्हणताहेत, आपले न्याय्य हक्क नाकारताहेत त्या सत्तेला चिकटून बसलेल्या गोचिडी आहेत. सत्तेला चिकटून लोकशाहीचे रक्त पिताहेत. त्या गोचिडी खेचून बाहेर काढाव्याच लागतील,’ असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले.
इंग्रजांसारखे आता जुलमी सत्ताधाऱ्यांना पळावे लागेल
जंतरमंतरवर सैन्याची जमवाजमव सुरू झाली आहे. इंग्रजांनीही अशीच शंभर-दीडशे वर्षे राज्य केले होते. पण देशातील जनता एकजुटीने रस्त्यावर उतरली तेव्हा इंग्रजांना इथून पाय काढून पळावे लागले होते. तसेच आता सत्ताधाऱयांना करावे लागेल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
लोकशाहीचा खून
सफेद चादरीमध्ये गुंडाळून सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून रुग्णालयात नेले. त्याच्या निषेधार्थ आजच्या आंदोलनात एक सफेद रंगाचा बॅनर झळकावण्यात आला. त्यावर लोकशाहीचा खून असे लाल रंगामध्ये लिहिले होते. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवरांनी तो झळकावला. यावेळी भारतमाता की जय… वंदे मातरम… अशा घोषणांनी शिवतीर्थाचा परिसर दुमदुमला.
दिल्लीला वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन. मी एकटा गेलो असतो तर फरक पडला नसता, पण आज अख्खा महाराष्ट्र तिकडे उभा आहे. वांगचुक यांचे आंदोलन आता फक्त जंतरमंतरपर्यंत मर्यादित ठेवायचे नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, गल्लीगल्लीत पसरले पाहिजे.
महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय. तुम्हाला जसे जमेल जसे झेपेल तसे हे स्वातंत्र्य जपण्याचे युद्ध सुरू करा. सभा घ्यायच्यात तिथे सभा घ्या. मशाल मोर्चा काढा. मेणबत्ती मोर्चा काढा. मानवी साखळ्या करा, पण आता सरकारला कळले पाहिजे की… अब देश इन लोगों की बात माननेवाला नही.
जंतरमंतरवर सैन्य आणताय, मग घुसवा ना पाकव्याप्त कश्मीरमध्ये. का नाही घुसवत! देशाच्या रक्षणासाठी तयार झालेल्या तरुणांचा आंदोलन चिरडण्यासाठी वापर करणार. तरुणांना तरुणांविरुद्ध वापरणार आणि पंतप्रधान, गृहमंत्री काय जिलब्या पाडत बसणार की ढोकळा खात बसणार. इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेटच्या गोळय़ा आणि देशातील तरुणांना बंदुकीच्या गोळ्या.
‘मी देशभक्त’ अशा टोप्या घाला… देशभक्तांची ताकद दाखवा
अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी ‘मै अण्णा हूँ’ अशा टोप्या आंदोलकांनी परिधान केल्या होत्या. आता ‘मै देशभक्त हूँ’, ‘मी देशभक्त’ असे करा. मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त असलो तर माझ्या भारतमातेचा आहे, मोदींचा अंधभक्त मी कदापि असणार नाही, होऊ शकत नाही. आजपासून अशी चळवळ सुरू करा. अंधभक्त मोदी भक्तांना तुमच्यासमोर उभे राहायला भीती वाटली पाहिजे अशी देशभक्तांची ताकद आजही या देशात आहे व ती उभी राहू शकते आणि ती हा महाराष्ट्र उभी करू शकतो हे यांना दाखवून देऊया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
जो तरुणांना झुरळ म्हणतो, जो आपल्याला न्याय्य हक्क नाकारतो. सत्तेला चिकटलेल्या त्या सगळ्या गोचीड आहेत आणि लोकशाहीचं रक्त पीत आहेत. या गोचीड आपल्याला
खेचून बाहेर काढाव्याच लागतील.
जो पाकिस्तान आपल्या सैनिकांचा बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा करायची तयारी आहे, मग आपल्या सैनिकांसाठी सोलर कॅम्प बनवणारे वांगचुक यांच्याबरोबर मोदी चर्चा का नाही करत?
Comments are closed.