FIFA World Cup 2026 – जपानचा गोल चौकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वर्ल्ड कपमध्ये शनिवारी दोन परस्परविरोधी चित्रे पाहायला मिळाली. एका मैदानावर गोलसाठी दोन्ही संघांनी जीव तोडून प्रयत्न केले, पण चेंडू जाळ्यात शिरलाच नाही. तर दुसऱ्या मैदानावर जपानी समुराईंनी गोलांचा असा धडाका लावला की, प्रतिस्पर्ध्यांचा वर्ल्ड कप प्रवासच संपुष्टात आला. ग्रुप-ईमध्ये इक्वाडोर आणि कुरासाव यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला, तर जपानने टय़ुनिशियाचा 4-0ने धुव्वा उडवत बाद फेरीच्या दिशेने पाऊल टाकले.

इक्वाडोर आणि कुरासाव यांच्यातील लढतीत पहिल्या सत्रात इक्वाडोरने आक्रमणाचा जोरदार मारा केला. चेंडूवर त्यांचे वर्चस्व होते, संधीही अधिक निर्माण झाल्या, पण अंतिम फटक्याच्या वेळी अचूकता गायब झाली. कुरासावने मात्र बचावात कमालीची शिस्त दाखवत प्रतिस्पर्ध्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. दोन्ही सत्र गोलशून्य बरोबरीत संपले, मग इंज्युरी टाइममध्येही निकाल बदलला नाही आणि सामना 0-0 असा संपला. या निकालामुळे दोन्ही संघांच्या बाद फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

जपानने टय़ुनिशियाचा खेळ संपवला

ग्रुप-एफमध्ये जपानने मात्र सुरुवातीपासूनच टय़ुनिशियावर वर्चस्व गाजवले. चौथ्याच मिनिटाला केइतो नाकामुराच्या अचूक पासवर डाएची कामादाने गोल करत जपानला आघाडी मिळवून दिली. टय़ुनिशिया अजून सावरत नाही तोच 31 व्या मिनिटाला आयासे उएदाने दुसरा गोल ठोकत स्कोअर 2-0 केला. मध्यंतरानंतरही जपानचा दबदबा कायम राहिला. 69 व्या मिनिटाला जुन्या इटोने तिसरा गोल झळकावला, तर 83 व्या मिनिटाला उएदाने स्वतःचा दुसरा आणि संघाचा चौथा गोल करत टय़ुनिशियाच्या आशांवर अखेरचा घाव घातला.

Comments are closed.