FIFA World Cup 2026 – अटलांटावर तिकिटांचा हल्ला, काही मिनिटांतच अर्जेंटिना-इंग्लंडची तिकिटे सोल्डआऊट
अर्जेंटिना आणि इंग्लंडची उपांत्य फेरी निश्चित होताच अटलांटातील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमच्या सुमारे ७१ हजार प्रेक्षक क्षमतेच्या मैदानासाठी तिकिटांचा अक्षरशः स्फोट झाला. अधिकृत फिफा तिकीट संकेतस्थळावर काही मिनिटांतच सर्वसामान्य विक्रीतील उपलब्ध तिकिटे संपली, तर प्रतीक्षा यादी हजारोंच्या घरात गेली. फिफाच्या नियमानुसार अनेक तिकिटे आधीच प्रायोजक, हॉस्पिटॅलिटी, व्यावसायिक भागीदार, स्थानिक आयोजन समिती आणि दोन्ही देशांच्या फुटबॉल संघटनांसाठी राखीव होती. उर्वरित तिकिटांवर चाहत्यांनी तुटून पडत संकेतस्थळावर प्रचंड गर्दी केली.
५० हजार समर्थकांची गर्दी
अटलांटात इंग्लंडच्या सुमारे २५ ते ३० हजार, तर अर्जेटिनाच्या २० ते २५ हजार समर्थकांची उपस्थिती दिसू शकते, असा स्थानिक पर्यटन आणि तिकीट बाजाराचा अंदाज आहे. याचाच अर्थ या सामन्यासाठी उभय संघांचे किमान ४० ते ५० हजार चाहत्यांची गर्दी अपेक्षित आहे. उर्वरित जागांवर अमेरिकेतील तटस्थ फुटबॉलप्रेमी, कॉर्पोरेट पाहुणे आणि इतर देशांचे चाहते असतील. म्हणजेच स्टेडियममध्ये जवळपास प्रत्येक दुसरा प्रेक्षक इंग्लंड किंवा अर्जेटिनाचा समर्थक असेल.
Comments are closed.