FIFA WC 2026: स्पर्धेबाहेर झाल्याने फेडरेशनने संघाचे चार्टर प्लेन केेले रद्द! खेळाडूंना व्यावसायिक विमानाने प्रवास करण्यास सांगितले
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये अनेक संघांनी पदार्पण करताना उल्लेखनीय कामगिरी करत राउंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश केला, मात्र काही विश्वविजेत्या आणि नावाजलेल्या संघांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. या स्पर्धेच्या गट फेरीतून बाहेर पडल्याने उरुग्वेच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला मोठा धक्का बसला. स्पर्धेतील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने (फेडरेशन) खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी बूक केलेले विशेष चार्टर प्लेन रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वचषकातून संघाचे धक्कादायक आणि अपेक्षेपेक्षा लवकर बाहेर पडणे हे फेडरेशनच्या या निर्णयामागील कारण आहे. मेक्सिकोमधील प्लाया डेल कार्मेन येथील संघाच्या प्रशिक्षण तळावरून मॉन्टेव्हिडिओला जाणारी संघाची नियोजित चार्टर विमानसेवा रद्द केली. त्याऐवजी खेळाडूंना व्यावसायिक विमानांनी स्वत: च्या मार्गाने परतण्यास सांगितले आहे.
कोणत्याही मोठ्या स्पर्धेनंतर राष्ट्रीय संघ आणि त्यांच्या महासंघांनी बुक केलेल्या चार्टर विमानांनी एकत्र मायदेशी परततात. आता उरुग्वेच्या फुटबॉल असोसिएशनच्या निर्णयामुळे त्यांचे खेळाडू एकत्र मायदेशी येणार नाहीत. त्यांना त्यांच्या प्रवासाची स्वतंत्रपणे व्यवस्था करावी लागेल. काही खेळाडू सुट्टीसाठी किंवा युरोप आणि इतर देशांमधील त्यांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी थेट मॉन्टेव्हिडिओला परततील.
स्पर्धेत उतरण्यापूर्वी जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेला उरुग्वे ३२ संघांच्या फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरलेला सर्वोच्च मानांकित संघ होता. दोन वेळेच्या माजी विश्वविजेत्या संघाला या स्पर्धेत स्पेन, केप वर्दे आणि सौदी अरेबिया यांच्यासोबत एच गटात ठेवले होते. यामुळे स्पर्धेआधी स्पेन आणि उरुग्वे हेच पुढील फेरीत पोहोचतील असे मानले जात होते. मात्र या स्पर्धेत उरुग्वेला सौदी अरेबियाविरुद्धचा पहिला आणि केप वर्देविरुद्धचा दुसरा सामना जिंकण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने अनिर्णीत राहिले होते.
तसेच स्पेनविरुद्धच्या तिसऱ्या साखळी सामन्यात १-० असा पराभव झाला आणि उरुग्वे स्पर्धेबाहेर झाले. त्यांना या तीन सामन्यांमधून केवळ दोन गुण मिळवता आले. एच गटातून स्पेन आणि केप वर्दे पुढील फेरीत पोहोचले.
स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर समोर आलेल्या वृत्तांनुसार, संघातील संबंध बिघडले होते. तसेच स्पेनविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी खेळाडूंनी बंड केले होते, तर उरुग्वेमधील स्थानिक वृत्तांनी संघातील काही गट आणि प्रशिक्षण कर्मचारी यांच्यात वाढत्या तणावाकडे लक्ष वेधले होते.
Comments are closed.