आर्थिक प्रभावकांना नियमनाचा सामना करावा लागेल

मेटानंतर गुगल अन् सेबीदरम्यान चर्चा : प्ले स्टोअरवर ‘व्हेरिफिकेशन टिक’ची तयारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

सोशल मीडियाद्वारे गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणे आणि फसवणूक रोखण्यासाठी सेबीने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. नियामक सेबी गुगल अन् मेटासोबत मिळून अशी व्यवस्था तयार करू पाहत आहे, ज्याद्वारे गुंतवणूक संबंधी जाहिरात देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांची ओळख आणि त्याची सेबीमधील नोंदणी थेट पडताळून पाहता येऊ शकेल. मेटाने सेबीच्या या खास पडताळणी व्यवस्थेला लागू केले आहे. तर गूगलसोबत ही व्यवस्था लागू करण्यावरून चर्चा सुरू आहे.

ही व्यवस्था गूगलच्या पूर्वीपासून लागू सामान्य वित्तीय सेवा जाहिरात धोरणापेक्षा वेगळी आहे. गूगलच्या धोरणात जाहिरातदाराला संबंधित नियामकाकडून प्राप्त परवाना किंवा सूटचा पुरावा द्यावा लागतो. सेबीच्या नव्या व्यवस्थेत त्याच्या नोंदणीकृत वित्तीय मध्यस्थांची ओळख सेबीच्या स्वत:च्या अभिलेखाशी थेट जोडली जाणार आहे. याकरता त्यांना पूर्वीपासून नोंद मोबाइल क्रमांक आणि ईमेलचा वापर करावा लागेल.

सेबीने एप्रिल 2025 मध्ये यासंबंधी व्यवस्था निश्चित केली होती. यानंतर मेटाने भारतात रोखे अन् गुंतवणूक संबंधी जाहिरात देणाऱ्यांसाठी सेबीकडून प्रमाणन आवश्यक ठरविले होते. आता गूगलसोबत देखील हीच व्यवस्था लागू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. यामुळे नोंदणीकृत नसलेल्या लोकांसाठी गुंतवणूक सल्ला किंवा वित्तीय उत्पादनांच्या नावावर जाहिरात चालविणे अवघड ठरणार आहे. जाहिरात देणाऱ्याची ओळख केवळ त्याच्या दाव्याच्या आधारावर नव्हे तर सेबीच्या नोंदीतून पडताळली जाणार आहे.

प्ले स्टोरवर व्हेरिफिकेशन टिक

वित्तीय प्रकरणांमध्ये भ्रामक सल्ले देणाऱ्या इन्फ्लुएंसर्सची वाढता संख्या पाहता व्हेरिफिकेशन टिक किंवा लेबल देण्याच्या योजनेवरही विचार केला जातअ ाहे. यामुळे सामान्य गुंतवणुकदारांना सोशल मीडिया किंवा अन्य डिजिटल व्यासपीठांवर वित्तीय सल्ला देणारा व्यक्ती सेबीच्या नियामकीय कक्षेत आहे की नाही हे ओळखण्यास मदत मिळणार आहे.

संसदीय स्थायी समितीची शिफारस

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने स्वत:च्या 259 व्या अहवालातही सेबीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबत अशाप्रकारची व्यवस्था विकसित करण्याची सूचना केली आहे. केवळ नोंदणीकृत आणि अधिकृत वित्तीय इन्फ्लुएंसर्सना गुंतवणूक संबंधी सल्ला किंवा प्रचाराची नोंदणी मिळेल अशाप्रकारची ही व्यवस्था असणार आहे. समितीने व्हेरिफिकेशन टिकची शक्यता पडताळण्याची शिफारस केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने होणार देखरेख

सेबी भ्रामक वित्तीय सामग्रीची ओळख पटविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेख व्यवस्थाही मजबूत करत आहे. गूगल, मेटा आणि अन्य प्लॅटफॉर्म्ससोबत मिळून अशी व्यवस्था निर्माण करण्यावर जोर आहे, ज्याद्वारे संशयास्पद सामग्री आणि नोंदणीकृत नसलेल्या वित्तीय इन्फ्लुएंसर्सची ओळख जलदपणे पटविता येईल आणि आवश्यकता भासल्यास त्यांना हटविता येऊ शकेल. सोशल मीडियावर अवास्तविक परताव्याचा दावा करणाऱ्या जाहिराती गुंतवणुकदारांना नुकसान पोहोचवित असतात. सेबी आता प्लॅटफॉर्म्सवर ओळखीची पडताळणी आणि देखरेखीला मजबूत करत या पूर्ण साखळीवर अंकुश आणण्याची तयारी करत आहे.

Comments are closed.