Chandrapur News – फटाक्याच्या स्फोटाने उसळलेली गिट्टी लागून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, वडिलांसोबत दुचाकीने जात असताना काळाचा घाला
चंद्रपूर शहरातील गजानन मंदिर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावर फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे उसळलेली गिट्टी डोक्याला लागल्याने पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कृष्णली ठोंबरे (५) असे मृत बालिकेचे नाव असून, ती आपल्या वडिलांसोबत दुचाकीने आत्याकडे जात होती. रस्त्यावर काही मुले फटाके फोडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तिच्या वडिलांनी दुचाकी थांबवली होती, मात्र त्याचवेळी झालेल्या मोठ्या स्फोटामुळे रस्त्यावरील गिट्टी उडून थेट कृष्णलीच्या डोक्याला लागली आणि ती गंभीर जखमी झाली.
या अपघातानंतर तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे तिला तातडीने खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाके फोडण्याच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.