राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या 17 वर्षीय खेळाडूचा अपघाती मृत्यू; आरोपीला सोडल्याने कुटुंबीयांचा आक्रोश, मृतदेह DCP कार्यालयासमोर ठेवून न्यायाची मागणी
नागपूरमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत 17 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अवनी मुकेश बघेल हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संघर्षनगर चौकात हा अपघात झाला. अवनी रस्ता ओलांडण्यासाठी यू-टर्न घेण्याच्या प्रतीक्षेत असताना भरधाव दुचाकीने तिला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या अवनीला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अवनी ही सेपक टकरा या खेळातील उत्कृष्ट खेळाडू होती. तिने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच महाराष्ट्राकडून चार ते पाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत सुवर्णपदके जिंकली होती. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने आपले कौशल्य दाखवले होते. तिच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. खेळासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे आणि स्पर्धांसाठी दुसऱ्या शहरात जाण्याचा खर्च करणेही कुटुंबाला कठीण जात होते. अशा वेळी तिची अकादमी आणि सहकारी खेळाडू मदतीसाठी पुढे येत असत. अनेक अडचणींवर मात करून तिने महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली होती.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडल्याचा आरोप अवनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही माहिती समजल्यानंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत नातेवाईकांसह खेळाडूंनी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली थेट डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन केले. न्यायाच्या मागणीसाठी अवनीचा पार्थिव देहही रुग्णवाहिकेतून डीसीपी कार्यालयासमोर आणण्यात आला. आरोपीला पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
न्यायाच्या मागणीसाठी अवनीचे कुटुंबीय, खेळाडू आणि स्थानिक नागरिकांनी तिचे पार्थिव रुग्णवाहिकेतून पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर नेले. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. अवनीच्या निधनामुळे एका होतकरू खेळाडूची कारकीर्द संपुष्टात आली असून, तिच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
Comments are closed.