प्रथम वंदे मातरम, त्यानंतर जन गण मन.
गृह मंत्रालयाकडून राज्यांना निर्देश जारी : उच्चार व सादरीकरण नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने राष्ट्रगान, जन-गण-मन आणि राष्ट्रगीत वंदे मातरम यासंदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांना नवीन निर्देश जारी केले आहेत. कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गायन किंवा वादन आवश्यक आहे, हे नियमांमध्ये नमूद केलेले आहे. जर दोन्ही एकत्र सादर केले जाणार असतील, तर प्रथम वंदे मातरम गायले जाईल आणि त्यानंतर जन-गण-मन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या राज्यांचे स्वत:चे राज्यगीत आहे, त्यांनाही स्थापित क्रमाचे पालन करावे लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने 9 जुलै रोजी सर्व राज्ये आणि मंत्रालयांना एक पत्र पाठवले असून त्याचा तपशील शुक्रवारी उघड झाला.
सर्व राज्यांना राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताचे मूळ शब्द, अचूक उच्चार आणि विहित सादरीकरण यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. कोणत्याही चुका टाळण्यासाठी दोन्हींचा अधिकृत मजकूर आणि अचूक उच्चार मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत गाण्यासंबंधीच्या नियमांचा पुनरुच्चार करण्यात आला असून, त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांची प्रशासने आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांना त्यांच्या अखत्यारीतील संस्था आणि संघटनांना विहित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्यास सांगितले आहे.
Comments are closed.