मुदत ठेवीच्या असल्याचा आरोप पावत्या बनावट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. ठेकेदारांकडून घेतलेल्या मुदत ठेव पावत्या बनावट असल्याचा तसेच बांधकाम विभागातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचा आरोप शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे. त्यापाठोपाठ नगरपालिकेतून अनेक कागदपत्रे गायब झाल्याची तक्रारच बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक गिरिधर गायकवाड यांनीही जव्हार पोलीस ठाण्यात दिल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पाटील यांनी 9 ऑक्टोबर रोजी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला होता. यामध्ये ठेकेदारांनी विविध कामकाजाच्या करारापोटी दिलेल्या मुदत ठेव पावत्या तपासण्याची मागणी केली होती. तसेच बांधकाम विभागात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता जव्हार यांनी भारतीय स्टेट बँक शाखा वाडा येथील शाखा व्यवस्थापक यांना 12 ऑक्टोबर रोजी 22 मुदत ठेव पावत्यांची सत्यता पडताळणी करण्याचे पत्र दिले होते. ही कुणकुण बोगस ठेव पावत्या देणाऱ्या ठेकेदारांना लागताच बांधकाम विभागातील काही कागदपत्रे संशयास्पदरीत्या गहाळ झाली. याबाबत बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक गिरिधर गायकवाड यांनी 17 ऑक्टोबर 2026 रोजी कागदपत्रे गायब झाल्याची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या कागदपत्रांमध्ये एफडीशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे नेमकी कशी गायब झाली? ती कोणी घेतली आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे? याची चौकशी होणे आवश्यक आहे.

एफडी कशासाठी घेतात?

शासकीय कामांसाठी ठेकेदारांकडून सुरक्षा अनामत रक्कम म्हणून एफडी जमा केल्या जातात. मात्र काही कामांमध्ये एफडीच्या वैधतेबाबत आणि अनामत रकमेच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. एफडी पावत्या खोट्या असतील किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे बनावट असतील तर संबंधित कामांच्या निविदा, बिले आणि अनामत रकमेच्या व्यवहारांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केली आहे. संबंधित निविदा, कामांची बिले, एफडीची मूळ कागदपत्रे, बँकेतील नोंदी आणि कार्यालयातील अभिलेख यांची पडताळणी केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकेल, असेही पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.