ब्लूटूथवर ‘BOMB’ नाव दिसले अन् विमानात एकच गोंधळ, स्पेनला जाणाऱ्या विमानात मोठी खळबळ
ब्लूटूथवर बॉम्ब नाव दिसताच न्यूजर्सीहून स्पेनला चाललेल्या विमानात एकच खळबळ उडाली. ब्लूटूथ डिव्हाईसमुळे सुरक्षेची चिंता निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून तीन तासांनी विमान माघारी परतले. विमान उतरल्यावर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोर्ट अथॉरिटी पोलिसांनी विमानाची कसून तपासणी केली. परिवहन सुरक्षा प्रशासन (TSA) आणि सीमाशुल्क व सीमा संरक्षण (CBP) यांच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना पुन्हा विमानात चढण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांची अतिरिक्त तपासणी केली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 767 चे UA236 हे विमान 30 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता न्यू जर्सीमधील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पेनसाठी रवाना झाले. विमानात 190 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. वारंवार ब्लूटूथ-सक्षम उपकरणे बंद करण्याची घोषणा करूनही दोन उपकरणे चालूच राहिली.
उड्डाणाच्या तीन तासांनंतर विमान अटलांटिक महासागरावरून जात असताना एका प्रवाशाने आपले ब्लूटूथ सुरू केले असता त्याला BOMB नावाचे नेटवर्क अॅक्टिव्ह दिसले. प्रवाशाने क्रू मेंबर्सला याबाबत माहिती दिली. वैमानिकाने सुरक्षेचा मोठा धोका लक्षात घेऊन विमान पुन्हा न्यू जर्सीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. विमान सुखरूप उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास केला. विमानात प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलाने गंमत म्हणून त्याच्या फिटबिट या फिटनेस बँडचे ब्लूटूथ नाव ‘बॉम्ब’ ठेवले होते. यामुळे विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता आणि विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
Comments are closed.