अमेरिकासोबतच्या तणावादरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी दिला राजीनामा? वाचा सविस्तर
आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराबाबत चर्चा सुरू आहे. मात्र यादरम्यान इराणमध्येही अंतर्गत तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. फॉक्स न्यूजने इराणी माध्यमांच्या एका अहवालाचा हवाला देत दावा केला आहे की, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाकडे कथितरित्या आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून हा राजीनाम्याचा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इराण इंटरनॅशनलच्या एका निनावी सूत्राचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे की, पेजेशकियन यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या प्रशासनाला इराणमधील मोठ्या निर्णयांच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. तसेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स मधील कट्टरपंथी गटांनी महत्त्वाच्या बाबींवर नियंत्रण मिळवले आहे. अशा परिस्थितीत आपण प्रभावीपणे प्रशासन चालवण्यास किंवा आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास असमर्थ आहोत आणि त्यामुळे आपण तत्काळ राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची विनंती करत आहोत, असे पेजेशकियन यांनी लिहिल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांचे कार्यालय हा राजीनामा स्वीकारणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही इराण इंटरनॅशनलने नमूद केले आहे.
यावर इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी राजीनाम्याशी संबंधित हे सर्व अहवाल फेटाळून लावले आहेत. राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील दळणवळण व माहिती प्रसार विभागाचे उपप्रमुख सय्यद मेहदी तबातबाई यांनी सांगितले की, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका तरुणाने राष्ट्राध्यक्षांच्या पदाबाबत केलेल्या निराधार आणि वादग्रस्त विधानांना गांभीर्याने घेतले जाऊ नये. काही भरकटलेल्या घटकांच्या बालिश वर्तनामुळे तरुणांमध्ये देश चालवण्याची क्षमता नाही, असा खोटा समज पसरवू नये.
Comments are closed.