ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोडला देश! पोर्तुगालकडून खेळणार टी 20 वर्ल्ड कप 2028 क्वालिफायरमध्ये
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडूने पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मोईसेस हेन्रिक ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी टी २० विश्वचषक पात्रता फेरीत आपल्या जन्मदेशाचे (पोर्तुगाल) प्रतिनिधित्व करणार आहे. या अनुभवी क्रिकेटपटूने पोर्तुगालसोबत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोईसेसचा जन्म पोर्तुगालमध्ये झाला होता, मात्र काही वर्षांनंतर त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाले, जिथे त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. त्याने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने चार कसोटी, १६ वनडे आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली आहेत.
मोईसेसने २०२१ पासून ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. आंतरराष्ट्रीय संधी मर्यादित असल्याने त्याने आता पोर्तुगालसाठी खेळण्याची संधी स्वीकारली आहे. पोर्तुगाल २०२८ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा दिशेने असून त्याने त्यांच्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना मिळाले आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील पोर्तुगालच्या मोहिमेची सुरूवात फिनलंडमध्ये होणाऱ्या युरोपियन उप-प्रादेशिक पात्रता फेरीने होईल.
पूर्ण सदस्य राष्ट्रातून सहयोगी राष्ट्रात जाणाऱ्या खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घालून दिलेला तीन वर्षांचा अनिवार्य स्थगिती कालावधी पूर्ण केल्यानंतर मोईसेस पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरला आहे.
त्याचबरोबर मोईसेस आयपीएलमध्येही खेळला आहे. त्याने यामध्ये पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये त्याने १००० धावा केल्या आणि ४२ विकेट्सही घेतल्या आहेत.
मोईसेस हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी देशांतर्गत आणि फ्रॅंचायझी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत इंडियन प्रीमियर लीगबरोबर ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेट, बिग बॅश लीग आणि चॅम्पियन्स लीग टी२० मध्ये मिळून ११ प्रमुख विजेतेपद जिंकली आहेत.
Comments are closed.