हार्दिक पंड्याने सोडली मुंबई, आपल्या कारकिर्दीसाठी बंगळुरूला स्थायिक होण्याचा घेतला निर्णय!
स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने त्याच्या उर्वरित क्रिकेट कारकिर्दीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो मुंबई सोडून बंगळुरूला कायमस्वरूपी स्थायिक झाला आहे. त्याने शहराच्या बाहेरील भागात, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) च्या जवळ एक घर भाड्याने घेतले आहे. त्यामुळे जेव्हा तो भारतीय संघ, आयपीएल किंवा इतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त नसेल तेव्हा तो बीसीसीआयच्या सीओईमध्ये असेल.
हार्दिक मागील काही वर्षांपासून दुखापतींचा सामना करत आहे. त्याने सध्या उचलेले पाऊल हे त्याची संपूर्ण क्रिकेट रणनीती बदलणारे आहे. त्याने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये उल्लेखनीय खेळी आहे, मात्र तेवढाच तो त्याच्या दुखापतींमुळेही चर्चेत राहिला आहे. पाठीचा त्रास, मांडीच्या स्नायूंची दुखापत आणि घोट्याची दुखापत या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याला अनेक मोठ्या मालिकांना मुकावे लागले आहे. त्यामुळे त्याने आता त्याच्या कारकिर्दीची उर्वरित वर्षे पूर्णपणे फिटनेसनुसार आखण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या उर्वरित कारकिर्दीसाठी बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हेच आपले कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र बनवणारा हार्दिक पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. २०२७ चा वनडे विश्वचषक आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; त्याला आणखी ५ ते ६ वर्षे खेळण्याची इच्छा आहे. यामुळेच त्याने बंगळुरूला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.