शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक, मसाला येथील दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
निलंगा तालुक्यातील मसलगा येथे मंगळवारी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन सख्ख्या भावांचा तब्बल चार एकर ऊस जळून खाक झाला. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे कष्टकरी शेतकरी कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला असून, सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातील राम जाधव आणि दत्ता जाधव या दोन सख्ख्या भावांच्या उसाच्या फडात अचानक आग भडकली. परिसरातील विद्युत तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यावेळी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि ज्वाला दूरवर दिसू लागल्या.
आगीचे वृत्त समजताच मसलगा गावचे सरपंच गणेश शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष तोरखडे यांच्यासह शेकडो तरुणांनी तातडीने उसाच्या फडाकडे धाव घेतली. तरुणांनी उपलब्ध पाणी, ट्रॅक्टर आणि झाडांच्या फांद्यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी घटनेची माहिती देऊन अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थांच्या संयुक्त आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
ग्रामस्थांनी धाव घेतली अन् मोठी हानी टळली
गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी दाखवलेली तत्परता निर्णायक ठरली. वेळेवर मदत पोहोचल्यामुळे आगीचा भडका लगतच्या इतर शेतकऱ्यांच्या उसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखता आला. या उसाच्या लगतच या दोन्हीही शेतकरी भावांचे घर असल्याने आग घरापर्यंत पोहोचण्याअगोदरच तरुणांनी मोठ्या प्रयत्नातून ती आटोक्यात आणली; अन्यथा मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती. या प्रसंगावधानाबद्दल गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.