मांजरा, तेरणा कोरड्या; पाण्याअभावी शेकडो चिमण्यांचा तडफडून मृत्यू! शेतशिवारात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष
पावसाने दिलेल्या दणक्याऐवजी ओढलेल्या ताणामुळे लातूर जिल्ह्यावर पाण्याचे भीषण संकट घोंघावत आहे. जिल्ह्याच्या जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या मांजरा आणि तेरणा या दोन्ही प्रमुख नद्या यंदा कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतशिवारात कुठेही पाण्याचा थेंब शिल्लक नसल्याने पिकांची वाताहत तर सुरूच आहे; पण आता तहानेने व्याकुळ झालेल्या शेकडो चिमण्यांसह इतर पक्षी आणि मुक्या प्राण्यांनाही पाण्याअभावी आपला जीव गमवावा लागत आहे.
यंदा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने मांजरा आणि तेरणा नदीपात्राने तळ गाठला आहे. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, पिके, जनावरे आणि पक्षी आज पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. नदीकाठावरील उसाचे क्षेत्र अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत होरपळून वाळून जात आहे. एकीकडे बळीराजा हवालदिल झाला असताना, दुसरीकडे निसर्गाच्या या अवकृपेचा फटका मुक्या जिवांनाही बसत आहे.
शिवारात आणि नद्यांमध्ये पाणी नसल्याने तहान शमवण्यासाठी भटकणाऱ्या अनेक चिमण्या रानावनात आणि शेतात मृतावस्थेत आढळून येत आहेत. पाण्यासाठी तडफडून जीव सोडणाऱ्या या चिमुकल्या जिवांच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिकांसाठी पाणी नसल्याची चिंता असतानाच आता माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचाही जीव धोक्यात आल्याने दुष्काळाची दाहकता अधिकच गडद झाली आहे.
दि. २० नोव्हेंबरपासून लातूरमध्ये ‘सेव्ह मांजरा’ अर्थात मांजरा नदी वाचवा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. श्रीकांत दुबे आणि प्रमोद माचबोने यांनी पुढाकार घेत या मोहिमेला सुरुवात केली असून, नदीपात्रातील पडलेली घाण साफ करत असताना काही भागांमध्ये नदीपात्रात मृत अवस्थेमध्ये शेकडो चिमण्या आढळून आल्या तर काही चिमण्या तडफडत असल्याचेही दिसून आले आहे. नदीपात्रातील घाण व घाण पाणी याचाही फटका या चिमण्याच्या जीव जाण्यास कारणीभूत असू शकतात असे स्वच्छता मोहीम राबवत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. परंतु सदरील चिमण्या ही शेतशिवारात व नदीपात्रात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे मृत अवस्थेत आढळले आहेत पाण्यावाचूनही पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे असे विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. यासाठी वन्य प्राणी पक्षी यांच्यासाठी पानवटे तयार करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तर पक्षी प्रेमींनी किंवा शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारातल्या झाडाच्या फांदीला पक्षांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी असा संदेश या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Comments are closed.