ट्रेनला लागलेल्या आगीत चार डबे जळून खाक
पटियालामध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग :सुदैवाने जीवितहानी टळली
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. पंजाबच्या पटियाला जिह्यात राजपुरा स्टेशनवर ट्रेन पोहोचल्यावर ही दुर्घटना घडली. आग वेळीच नियंत्रणात आणण्यात आली असली तरी रेल्वेचे चार डबे बेचिराख झाले आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भारतीय रेल्वेने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून सर्व संभाव्य बाबींची तपासणी केली जाईल असे म्हटले आहे. आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अशा घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत.
एक्स्प्रेसच्या आगीची दुर्घटना सराई वंजारा गावाजवळ घडल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरून भीषण व्हिडिओ समोर आले असून त्यात सर्व बाजूंनी धुराचे लोट दिसत आहेत. धावत्या ट्रेनला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुरुवातीला आग पॅन्ट्रीमध्ये लागली. त्यानंतर ती इतर डब्यांमध्ये विस्तारल्याचे पटियालाचे डीसी हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले. फायर अलार्म वाजल्यानंतर सर्व प्रवासी सावध झाले आणि त्यांनी ट्रेन रिकामी केली. आगीची माहिती मिळताच प्रवासी सुखरुपपणे बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनीही सांगितले.
Comments are closed.