संदेशखळी हिंसाचाराची नव्याने चौकशी

मारले गेलेल्या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह काढला बाहेर

वृत्तसंस्था, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सुमारे 5 वर्षांनी थडग्यामधून पुन्हा बाहेर काढण्यात आला आहे. 2021 साली संदेशखाली येथे निवडणुकीनंतर हिंसाचार झाला होता. यात मारले गेलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या मृतदेहाचे अवशेष 5 वर्षांनी थडग्यामधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

या अवशेषांची आता उत्तरीय तपासणी करविण्यात येणार आहे. पूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी अवशेषांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर संबंधिताच्या परिवाराने आवश्यकता भासल्यास सीबीआय चौकशी करविण्याची आणि मृत्यूसाठी जबाबदार लोकांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

2021 मध्ये काय घडले होते?

2021 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर झनझनिया गावातील रहिवासी आस्तिक चंद्र दास यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आस्तिक हे गंभीर जखमी झाले होते आणि तरीही त्यांना रुग्णालयात नेण्यापासून तृणमूल कार्यकर्त्यांनी रोखले होते, यामुळे त्यांचा घरीच मृत्यू झाला होता असा आरोप आहे.  तर आस्तिक यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करत मृतदेह दफन करण्यासाठी भाग पाडले गेले होते. परिवारानुसरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी देखील करविण्यात आली नव्हती.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यावर आणि भाजप सरकार आल्यावर परिवाराने नवी तक्रार नोंदविली. यानंतर न्यायालयाने मृतदेह थडग्यामधून बाहेर काढण्याचा आदेश दिला होता. न्यायदंडाधिकारी आणि परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीत अवशेष थडग्यामधून बाहेर काढण्यात आले.

भाजप आक्रमक

ही घटना 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी सहन केलेल्या अत्याचाराचा पुरावा आहे. तृणमूलच्या सरकारच्या काळात दहशतीचे वातावरण होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते. परंतु न्याय होणार असून या हत्येसाठी जबाबदार लोकांना कठोर शिक्षा होणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी केले आहे.

Comments are closed.