नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत… हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेचा चेहरा बदलणारे, आर. एन. काओ यांची कहाणी आता रुपेरी पडद्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानातील गुप्तचर यंत्रणेचा इतिहास सांगताना रामेश्वर नाथ काओ, म्हणजेच आर. एन. काओ यांचा विसर पडून चालणार नाही. काओ यांची कामगिरी ही हिंदुस्थानसाठी अत्यंत मोलाची मानली जाते. हिंदुस्थानची प्रमुख गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) उभी करण्यात काओ यांची निर्णायक भूमिका होती. 1971 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या काळात बांगलादेशच्या मुक्तीसाठी ‘रॉ’ने केलेल्या गुप्त मोहिमांमध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. आता याच गुप्तहेर अधिकाऱ्याचे जीवन रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्सने आर. एन. काओ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची घोषणा काही वर्षांपूर्वी झाली होती. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रदर्शनाची तारीख मिळाल्याने काओ यांचे जीवन पुन्हा चर्चेत आले आहे. ‘लिओ मीडिया कलेक्टिव्ह’च्या सहकार्याने हा चित्रपट तयार केला जात आहे.

रामेश्वर नाथ काओ यांचा जन्म 1918 मध्ये बनारस येथे एका काश्मिरी हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी लखनौ आणि अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेतले. 1940 च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याच काळात सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन तत्कालीन इंडियन इम्पीरियल पोलिसमध्ये प्रवेश केला. स्वातंत्र्यानंतर काओ यांची नियुक्ती इंटेलिजन्स ब्युरो (IB)मध्ये झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी गुप्तचर क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

1962 च्या हिंदुस्थान -चीन युद्धानंतर हिंदुस्थानच्या गुप्तचर व्यवस्थेतील त्रुटींवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. लष्करी आणि परराष्ट्रविषयक बाबींशी संबंधित गुप्त माहिती अधिक प्रभावीपणे गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर काओ यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे पहिले संचालक झाले. पुढे 1968 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने इंटेलिजन्स ब्युरोचे विभाजन करून रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच राॅची स्थापन केली.
या नव्या संस्थेच्या उभारणीत काओ यांचा मोठा सहभाग होता आणि त्यांचीच राॅचे पहिले प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी जवळपास नऊ वर्षे या संस्थेचे नेतृत्व केले आणि सुरुवातीच्या काळात तिची रचना, कार्यपद्धती आणि परदेशातील गुप्तचर नेटवर्क मजबूत करण्याचे काम केले.

काओ यांचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी जवळचे संबंध होते. गुप्तचर यंत्रणेच्या कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता दोघांमधील थेट संवादाला विशेष महत्त्व होते. आता त्यांच्या याच गूढ आणि थरारक कारकिर्दीची कथा करण जोहर यांच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी गुप्तचर व्यवस्थेच्या पडद्यामागची कहाणी रुपेरी पडद्यावर कशी मांडली जाते, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.