शौचास गेलेल्या तरुणीला मारहाण करून अत्याचार, गडचिरोली पोलिसांकडून आरोपीला 24 तासात अटक

गडचिरोली : शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी शौचास गेली असता तिला मारहाण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. पीडित तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अनिल संतू उसेंडी (23) रा. छत्तीसगड, हल्ली मुक्काम शिवणी असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.

गडचिरोलीतील शिवनी गावात ही घटना सोमवारी घडली होती. पीडित तरुणी गावाबाहेर उघड्यावर शौचास गेली असता आरोपीने तिला मारहाण करुन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. त्यामुळे तरुणी बेशुद्ध पडली. बराच वेळ ती घरी परत न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, ती गावाबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. त्यावेळी तरुणीच्या हाताला जखमा झाल्याचं दिसून आलं. तसेच तिच्या डोळ्याखाली दगड किंवा विटेने मारहाण केल्याचे व्रण होते.

परिसरात खळबळ

जखमी अवस्थेतील तरुणीला तातडीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर पुढील उपचारासाठी तिला नागपूरला हलवण्यात आले. तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच आरोपी हा गावातील आहे की गावाबाहेरील आहे याचा अंदाज येत नव्हता. परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

तरुणीच्या जबाबावरुन आरोपीला अटक

दरम्यान, मंगळवारी युवती शुद्धीवर आल्यावर, जबाब नोंदवण्यासाठी सक्षम झाल्यानंतर तरुणीच्या जबाबावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीच्या अटकेसाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. जबाबादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलिसांकडून तयार करण्यात आलं आणि त्या आधारे अनिल उसेंडीला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.