20 वर्षांनंतर गाळेगाव मोहिलीकरांना मिळणार रस्ता, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गाळेगाव-मोहिली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने ९० लाख ४१ हजारांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर गाळेगाव-मोहिलीकरांना हक्काचा रस्ता मिळणार आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून येथून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनाऊ येत आहेत. मात्र आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे मोहिलीकरांना दिलासा मिळणार आहे.

गाळेगाव-मोहिली मार्गाची खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. दर पावसात या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थी, वृद्ध, महिलांना येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. याची दखल घेऊन रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कोट, नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ९० लाख ४१ हजार ३४५ रुपयांचा निधी मंजूर केल्याने शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नागरिकांना दिलासा

गाळेगाव-मोहिली रस्त्याची गेल्या २० वर्षांपासून दुरावस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. २० वर्षांनंतर टिकाऊ आणि मजबूत रस्ता होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

> गेल्या २० वर्षांपासून नागरिकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. मात्र या गावांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. अखेर रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने नागरिकांचा दीर्घकाळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
राहुल कोट, नगरसेवक

Comments are closed.