गणेशगल्लीत जीपीएलची फटकेबाजी, मिर्ची ग्रूपचा महाराष्ट्र दिनी क्रीडा तडका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लालबागच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा मिर्ची ग्रूप आता पुन्हा एकदा मैदान तापवायला सज्ज झाला आहे. गणेशगल्लीत येत्या 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान रंगणारी गणेश प्रीमियर लीग (जीपीएल) यंदा अधिक भव्य, अधिक जोशात आणि अधिक आक्रमक स्वरूपात खेळवली जाणार आहे.

गेल्या वर्षी खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम आणि क्रिकेट स्पर्धांनी गल्लीत उत्साह उसळवणार्‍या मिर्ची ग्रूपने यंदाही जीपीएलमध्ये पुरुष गटासोबतच महिला आणि ज्युनियर गटांचीही स्पर्धा कायम ठेवली आहे. त्यामुळे मैदानावर कौशल्य, जिद्द आणि संघर्ष यांचा तुफानी संग्राम पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 1 मे रोजी भव्य चित्रकला स्पर्धेने या क्रीडा महोत्सवाची दमदार सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी गणेशगल्ली प्रीमियर लीगमध्ये मुंबईतील विविध संघांमधील ताकदीची खरी कसोटी लागणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी अक्षरशः जीव तोडून खेळ होईल, असा विश्वास मिर्ची ग्रूपचे अध्यक्ष आणि नगरसेवक किरण तावडे यांनी व्यक्त केला आहे.

जीपीएलच्या मुख्य पुरुष गटात विजेत्या संघाला तब्बल ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेता २० हजाराच्या रकमेचा मानकरी होईल. याशिवाय वैयक्तिक कामगिरी गाजवणार्‍या खेळाडूंवरही पुरस्कारांची उधळण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसाठी मैदानात झोकून देणार, यात शंका नाही. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मिर्ची ग्रूपसोबत गणेशगल्ली मित्र परिवारही खांद्याला खांदा लावून काम करत असून कुणाल सावंत, विराज माडखोलकर आणि प्रथमेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी योगेश पारधिये (9773200439, 9619650222) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तावडे यांनी केले आहे.

Comments are closed.