IPL 2026 – चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी चूक; लाईव्ह सामन्यावेळी 240 सीसीटीव्हींचे कनेक्शन कापलं; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी एम. चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात सामना रंगला. 400 हून अधिक धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. मात्र लाईव्ह सामना सुरू असतानाच मैदानामधील 240 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन कापून त्यांचे फीड बंद करण्यात आले. त्यामुळे चिन्नास्वामी मैदानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएस डिजिटल सोल्युशन्स या उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. मंजुनाथ ई. आणि अब्दुल कलाम अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी एका निष्क्रिय ॲक्सेस कार्डचा वापर करून आणि कोणत्याही वैध पासशिवाय स्टेडियमच्या सीसीटीव्ही सर्व्हर रूममध्ये अनधिकृतपणे प्रवेश मिळवला. त्यानंतर एनव्हीआर आणि फायबर कनेक्शन कापून टाकले. यामुळे स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार, कॉन्कोर्स विभाग, डी-कॉर्पोरेट स्टँड आणि स्टेडियम परिसरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे थेट प्रक्षेपण बंद पडले.

सीसीटीव्हींचे थेट प्रक्षेपण बंद पडल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी बॅकअप उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सामना कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडला. या प्रकरणी आता कब्बन पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे आरोपींचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्याम, आयपीएल 2026 सुरू असताना चिन्नास्वामी मैदानावर घडलेली ही पहिलीच चुकीची घटना नाही. काही दिवसांपूर्वीच बंगळुरू पोलिसांनी तिकीट विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एका कॅन्टीन कामगाराला आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून सुमारे 100 तिकिटे जप्त करण्यात आली होती.

Comments are closed.