Ben Stokes – आत गेलेले गाल, सुकलेला चेहरा अन् निस्तेज डोळे; बेन स्टोक्सला झालंय काय? नवीन लूक पाहून चाहते चिंतेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्या चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चर्चेचे कारण क्रिकेट नसून त्याचा बदललेला चेहरा आहे. इंग्लंडच्या नवीन क्रिकेट किटच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये स्टोक्सचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचे आत गेलेले गाल, सुकलेला चेहरा अन् निस्तेज डोळे पाहून काहींनी तर हा स्टोक्स आहे की नाही अशी शंकाही व्यक्त केली.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नुकताच त्यांच्या नवीन किटचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बेन स्टोक्स इतर खेळाडूंसोबत दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये स्टोक्सचा चेहरा पूर्वीपेक्षा खूपच बारीक आणि वेगळा दिसत आहे. त्याचा हा नवीन लूक पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. बेन स्टोक्सला काय झाले आहे? काहीतरी गडबड वाटतेय, असे एका युझरने म्हटले, तर हा खरोखर बेन स्टोक्सच आहे की हे एआयने तयार केलेले चित्र आहे? असा सवाल अन्य एका युझरने केला.

दरम्यान, बेन स्टोक्सच्या चेहऱ्यात झालेला हा बदल अचानक झालेला नसून त्यामागे या वर्षाच्या सुरुवातीला झालेली एक मोठी दुर्घटना कारणीभूत आहे. फेब्रुवारी 2026 नेट सेशनदरम्यान स्टोक्सला गंभीर दुखापत झाली होती. सराव सुरू असताना एका तरुण खेळाडूने मारलेला चेंडू थेट स्टोक्सच्या तोंडावर लागला होता. त्यावेळी स्टोक्सने नेटमध्ये फलंदाजाकडे पाठ फिरवली होती. यामुळे त्याच्या गालाचे हाड मोडले होते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया करावी लागली.

या शस्त्रक्रियेनंतर स्टोक्सने त्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये त्याच्या डोळ्याखाली काळे डाग आणि नाकावर पट्टी दिसली होती. तसेच नंतर एका मुलाखतीत त्याने या दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट केले होते. तो चेंडू थेट माझ्या तोंडावर लागला. जर तो काही इंच इकडे-तिकडे लागला असता, तर कदाचित आज मी ही मुलाखत देण्यासाठी जिवंत नसतो. माझ्या चेहऱ्याच्या आतील हाडांचा पार चुरा झाला होता मी नशिबाने वाचलो आहे, असे तो म्हणाला होता.

Comments are closed.