गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवचं काय होणार?

नवी दिल्ली : भारतानं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात आणि कर्णधार सूर्यकुमार यादव  याच्या नेतृत्त्वात 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं. गौतम गंभीरपुढं आता पुढील मोठं आव्हान म्हणजे 2027 चा एकदिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप हे आहे. बीसीसीआयच्या करारानुसार गौतम गंभीर तोपर्यंत भारताचा मुख्य प्रशिक्षक असेल. मात्र, काही रिपोर्टनुसार गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कप पर्यंत मुदतवाढ मिळण्याची आशा आहे. तर, भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव गौतम गंभीरची पहिली पसंत आहे.

गौतम गंभीरला मुदतवाढीची आशा

भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ते पद सोडलं. यानंतर गौतम गंभीरकडे भारताचं मुख्य प्रशिक्षक पद देण्यात आलं आहे. गौतम गंभीरपुढं आता दोन आव्हानं आहेत ती म्हणजे भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणं आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवणं आणि भारताला विजेतेपद मिळवून देणं. मात्र, काही रिपोर्टनुसार गौतम गंभीर याला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ मिळेल अशी आशा आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवला गंभीरचं प्राधान्य

गौतम गंभीरला ज्या प्रमाणं 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ मिळण्याची आशा आहे. त्याप्रमाणेच सूर्यकुमार यादव हा कॅप्टन म्हणून गंभीरचं पहिलं प्राधान्य आहे. भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याचा फॉर्म संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी ठरत आहे.

सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये कधी परतणार?

भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला खरा मात्र त्याचा फॉर्म संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयची डोकेदुखी ठरत आहे. सूर्यकुमार यादवचं सध्याचं वय 35 वर्ष असून त्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 242 मात्र, त्यातील सर्वाधिक 81 धावांची खेळी अमेरिकेविरोधातील होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. सध्या आयपीएलमध्ये देखील मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादवनं चार मॅचमध्ये 106 धावा केल्या आहेत. दिल्ली विरोधात सूर्यकुमार यादवनं 51 धावा केल्या होत्या.

आयपीएल संपल्यानंतर भारताचा संघ टी 20 मालिकेसाठी आयरलँड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात सूर्यकुमार यादवची कामगिरी कशी राहते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. या दौऱ्यात सूर्यकुमार यादवनं दमदार कामगिरी केल्यास त्याच्याकडे ऑलिम्पिक आणि आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचं नेतृत्व सोपवण्यासंदर्भात संघ व्यवस्थापन विचार करु शकतं. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार आयरलँड आणि इंग्लंड दौऱ्यात सूर्यकुमार यादव कर्णधार असेल, मात्र त्यापुढील निर्णय कामगिरी आधारित असेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.