जर्मन एअरलाइन लुफ्थान्साकडून २० हजार हवाई उड्डाणे रद्द
जर्मन एअरलाइन लुफ्थान्साकडून तब्बल २० हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लुफ्थान्सा ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, रद्द झालेल्या या उड्डाणासंदर्भातील माहिती आता प्रवाशांना देण्यात आलेली आहे. उड्डाणे रद्द करण्यामागील प्रमुख कारण हे जेट इंधनाच्या वाढत्या किमती असल्याचे म्हटले आहे. एअरलाइनने यासंदर्भात एक निवेदन जारी करुन, अमेरिका इराण युद्धाच्या उद्रेकानंतर जेट इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. रद्द केलेल्या या उड्डाणांमुळे, अंदाजे ४० हजार मेट्रिक टन जेट इंधनाची बचत होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केएलएम, एअर कॅनडा, सिंगापूर एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि इतर प्रमुख विमान कंपन्यांच्या मागोमाग आता लुफ्थांसाने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमान कंपनीने स्पष्ट केले आहे की, लांब पल्ल्याच्या विमानसेवेवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे, लुफ्थान्सा ग्रुप आपल्या युरोपियन नेटवर्कला एकत्रित करण्याची योजना देखील आखत आहे. यामध्ये लुफ्थान्सा एअरलाइन्स, स्विस, ऑस्ट्रियन एअरलाइन्स, ब्रसेल्स एअरलाइन्स आणि आयटीए एअरवेज यांचा समावेश आहे. लुफ्थान्सा ग्रुपने म्हटले आहे की उन्हाळ्याच्या हंगामात इंधनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात स्थिर राहील अशी त्यांना अपेक्षा आहे.
Comments are closed.