मी बाबासाहेबांच्या जयंतीला नाचतो, लेझीम खेळतो, काल अनावधानाने नाव राहिलं; गिरीश महाजनांनी सगळंच
गिरीश महाजन: नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2026) आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाला. यावेळी वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव (Madhavi Jadhav) यांनी जाहीरपणे आक्षेप घेत, “मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा थेट सवाल केला. या प्रश्नामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर विरोधकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच गिरीश महाजन यांची राज्य मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा, अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. आता यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, कोणी काहीही मागणी करू शकतं, त्याबाबत काहीही दुमत नाही. मी काल देखील या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. भाषण संपल्यानंतर मला दोन मिनिटात समजलं की, गोंधळ झाला. तो अनावधानाने झाला. मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझ्या मनात उद्देश नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे.
Girish Mahajan: मी बाबासाहेबांच्या जयंतीला नाचतो, लेझीम खेळ
माझ्या गावात गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे सर्वात मोठे पुतळे मी उभारलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जयंतीला मी राज्यातला एकमेव मंत्री असेल जो पूर्ण वेळ मिरवणुकीत जातो. गेल्या 40 वर्षापासून मी त्या दिवशी निळा शर्ट घालतो, लेझीम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतो. मी अत्यंत उत्साहात जयंती साजरी करतो. तुम्ही माझ्या जिल्ह्यात जाऊन विचारा, असे गिरीश महाजन म्हणाले.
Girish Mahajan: दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केले पाहिजे?
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, माझ्याकडे अत्यंत चांगले वातावरण आहे. आमच्यात भाईचारा आहे. माझ्याकडे सगळे निवडून येणारे उमेदवार एससी कॅटेगरीचे आहेत. एक चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून अनावधानाने राहून गेला, त्याबद्दल लगेच राजीनामा द्या, ॲट्रॉसिटी दाखल करा. मी दोन मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यात जर राजकारण करायचे असेल तर माझा नाईलाज आहे. अनावधानाने माझ्याकडून राहिले. मी ते मान्य देखील केले. मी दिलगिरी व्यक्त केली अजून काय केले पाहिजे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Girish Mahajan: नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित करत मंत्री महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.