मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झा
गिरीश महाजन: नाशिक (Nashik) येथे प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून, गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Mahajan) यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व वादावर अखेर गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. मात्र, गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेवर आता टीकेची झोड उठत आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मला आज खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो, नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही. मी मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? हे मला काही समजत नाही.
Girish Mahajan: मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो
मी दिलगिरी व्यक्त केली. मी बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहीत नाही, त्या भगिनी कोण आहेत? मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवणाला बसतो, मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे, असे त्यांनी म्हटले.
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल
दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित मंत्री महाजन यांच्यासमोर उपस्थित केला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. तसेच, वनरक्षक कर्मचारी महिलांकडून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.