आणखी किती मुली समोर येतील माहिती नाही; प्रांजल खेवलकरांबाबत गिरीश महाजनांच्या वक्तव्याने चर्चां

प्रांजल खेवलकर आणि गिरीश महाजन: पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी एका हॉटेलवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा (Pune Rave Party) पर्दाफाश केला. या कारवाईत अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधील एका गुप्त फोल्डरमधून 252 व्हिडिओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले आहेत, असा दावा केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. तर अलीकडेच पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरून एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, प्रथमदर्शनी जे सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते, ते पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवले होते. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते की, चौदाशे फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे सापडले आहे. अनेक तरुण मुलींना पिक्चर आणि गाण्यांचे आमिष दाखवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. अत्याचार करण्यात आले. प्रांजल खेवलकरांविरोधात ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी किती मुली समोर येतील हे माहिती नाही. याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रांजल खेवलकर कोण आहेत?

प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. रोहिणी खडसे यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, बालपणीचे मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. प्रांजल खेवलकर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, ते राजकारणापासून दूर राहतात. त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे या मात्र राजकारणात सक्रिय आहेत. प्रांजल खेवलकर हे रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाशी संबंधित असून, त्यांच्या नावावर साखर व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. तसेच, त्यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडे पुण्यातील एका रेव्ह पार्टीत ते आढळून आल्यामुळे प्रांजल खेवलकर हे चर्चेत आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून…

आणखी वाचा

Comments are closed.