दिल्लीत काँग्रेस पराभवाच्या छायेत असताना नागपुरातील पराभूत उमेदवाराचे मोठं पाऊल,नेमकं काय घडलं?
नागपूर बातम्या: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (शनिवार, 8 फेब्रवारी) जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली असून यात भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारल्याचे चित्र आहे. अंतिम कौल जरी हाती आले नसले तरी आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या चुरस दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला (Congress) अद्याप खाते ही उघडता आले नसून काँग्रेस पक्ष जवळजवळ दारुण पराभवाच्या छायेत असल्याचे बोलले जात आहे.
असे असताना, नागपूरच्या काँग्रेसच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. ईव्हीएम तपासणीची मागणी करणारा अर्ज दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव (Girish Pandav) यांनी मागे घेतला आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र असताना नागपुरातील पराभूत उमेदवाराने हे मोठं पाऊल उचलून अचानक ईव्हीएम विरोधतील अर्ज मागे घेतल्याने अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
आमच्या शंकेचे समाधानच होत नसेल तर..
ईव्हीएममध्ये झालेल्या मतांच्या मोजणीसाठी गिरीश पांडव यांनी अर्ज केला होता. मात्र निवडणूक आयोगातर्फे कुठल्याही मतांची मोजणी करणार नाहीत, केवळ ईव्हीएम मशीनमध्ये काहीच गडबड नाही, इतकेच दाखवणार आहेत. त्यामुळे आमच्या शंकेचे समाधानच होत नसेल तर मग प्रशासनाकडे अर्ज करून काय फायदा? त्यामुळे आयोगाकडे केलेला अर्ज मागे घेतल्याची प्रतिक्रिया गिरीश पांडव यांनी दिली आहे. गिरीश पांडव यांनी निवडणूक आयोगाकडे याकरिता रक्कमही भरली होती. परंतु त्यांनी आपला अर्ज आज मागे घेतला आहे. परंतु उच्च न्यायालयात गिरीश पांडव यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाकडूनच अपेक्षा असल्याचे ही पांडव यांनी सांगितले.
दाद मागण्यासाठी पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव
काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपूर मधील पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणीसाठीचा अर्ज प्रशासनाकडे केला होता. भाजप सारखंच काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्यापूर्वी त्यामध्ये नवीन मतदार नोंदवण्यासाठी अर्ज केले होते. मात्र प्रशासनाने काँग्रेसचे मतदार नोंदणीचे अर्ज बाद ठरवले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मतदारांची नावे यादीत मोठ्या प्रमाणावर जोडली, असा आरोपही पांडव यांनी केला होता. दरम्यान, यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचे संकेत ही पांडव यांनी दिले होते. दरम्यान या संदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्याचा निकाल नेमका काढी आणि काय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.