'असा बकवास प्रश्न कसा…?' , पत्रकाराच्या प्रश्नावर गुजरातचा स्टार खेळाडू संतापला

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सला ९२ धावांनी पराभूत केले. जीटीच्या खेाडूंनी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी केली. या पराभवानंतर ग्लेन फिलिप्स पत्रकार परिषदेत दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले, कारण तो प्लेइंग ११ मध्ये नव्हता. पत्रकारांच्या कठीण प्रश्नांना सामोरे जाताना एका प्रश्नामुळे तो स्पष्टपणे संतापलेला दिसला.

एका पत्रकाराने ग्लेन फिलिप्सला विचारले की, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावा उभारल्यानंतर गुजरात टायटन्सने आधीच पराभव स्वीकारला होता का? हा प्रश्न ऐकताच फिलिप्स चकित झाला. त्याने हा प्रश्न मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आणि सांगितले की, कोणताही खेळाडू मैदानात उतरल्यावर शेवटपर्यंत लढण्याचीच मानसिकता ठेवतो. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने आयपीएल इतिहासातील प्लेऑफमधील सर्वोच्च धावसंख्या २५४ धावांपर्यंत मजल मारली. ज्यामध्ये रजत पाटीदारने ३३ चेंडूंमध्ये ९३ धावांची तुफानी खेळी साकारली.

फिलिप्स म्हणाला, “हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. खरंच. कोणताही खेळाडू हार मानण्याच्या विचाराने मैदानात उतरत नाही, मग आम्ही व्यावसायिक खेळाडू तसे का करू? हा अत्यंत चुकीचा प्रश्न आहे. आम्ही मैदानात आमचे सर्वस्व पणाला लावले. २५० धावांचा पाठलाग करताना प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे असते. आम्ही त्याच विचाराने मैदानात उतरलो होतो, पण दुर्दैवाने तसे घडले नाही.”

मात्र, फिलिप्सने मान्य केले की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना संघावर दबाव होता. तो म्हणाला, “२५० धावांचा पाठलाग करताना धावफलकाचा दबाव जाणवतोच. फार कमी संघांनी इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. पंजाब किंग्जने काही सामन्यांत हे करून दाखवले, जे खरोखरच विलक्षण होते.”

जेव्हा ग्लेन फिलिप्सला विचारण्यात आले की, “तुम्ही अंतिम संघात नसतानाही पत्रकार परिषदेत येताना अवघडल्यासारखे वाटते का?” त्यावर तो म्हणाला, “नाही, अजिबात नाही. आम्ही सर्व एका संघाचा भाग आहोत आणि माध्यमांसमोर आमची भूमिका समान असते. कधीकधी सामना न खेळणाऱ्या खेळाडूचा दृष्टिकोनही खूप महत्त्वाचा ठरतो. आम्ही आतापर्यंत चांगले क्रिकेट खेळलो आहोत. पुढील सामन्यासाठी मैदानातील खेळाडूंनी आवश्यक गोष्टी शिकणे गरजेचे आहे.”

आता गुजरात टायटन्ससमोर अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक आणि शेवटची संधी आहे. हा संघ २९ मे रोजी क्वालिफायर-२ सामना खेळणार आहे. त्यांचा सामना एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्या संघाशी होणार आहे. एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे.

Comments are closed.