समुद्री प्रदूषणाचा मत्स्यसंपदेवर परिणाम; गोव्यासह किनारी राज्यांत मासळी उत्पादनात घट – TMarathiNews

कोची : वाढते समुद्री प्रदूषण, अल निनोचा परिणाम, किनारपट्टीवरील अतिक्रमणे आणि समुद्रातील वाढती जलवाहतूक यामुळे गोव्यासह देशातील विविध किनारी राज्यांमध्ये मासळी उत्पादनावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मत्स्यसंपदेचे संवर्धन करून उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोची येथील केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्रामार्फत देशातील सागरी मत्स्यसंपदेचा विविध अंगांनी अभ्यास केला जातो. देशभरातील संशोधन उपकेंद्रांकडून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे मासळी उत्पादनातील बदलांचा अभ्यास करून केंद्र सरकारला आवश्यक त्या शिफारशी करण्यात येतात. या प्रक्रियेची माहिती केंद्रातील प्रधान संशोधक डॉ. विपिन कुमार यांनी दिली.

समुद्रात मोठ्या प्रमाणावर जहाजे, बार्जेस आणि अन्य जलवाहतूक सुरू असते. त्यातून होणारी तेलगळती तसेच इतर प्रकारचे प्रदूषण समुद्री जीवसृष्टीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. तेलगळतीमुळे तयार होणारे टार बॉल्स गोव्यासह विविध किनारी राज्यांच्या समुद्रकिनाऱ्यांवर आढळतात. याचा थेट परिणाम समुद्री पर्यावरण आणि मत्स्यसंपदेवर होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

याशिवाय किनारपट्टीवरील अतिक्रमणे, विविध विकास प्रकल्प आणि मानवी हस्तक्षेपामुळे मासळीच्या अधिवासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे समुद्री प्रदूषण रोखणे आणि मत्स्यसंपदेचे संरक्षण करणे हे सध्या मोठे आव्हान बनले आहे.

मासळीचे अस्तित्व टिकवून उत्पादन वाढविण्यासाठी समुद्रातील काही भाग संवेदनशील किंवा संरक्षित क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यावर संशोधन संस्थेने भर दिला आहे. अशा भागांमध्ये प्रदूषण आणि अनियंत्रित मानवी हस्तक्षेप कमी करून समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन करण्याचा उद्देश आहे.

या उपाययोजनांबाबत गोव्यासह देशातील सर्व किनारी राज्यांना प्रस्ताव आणि आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. मत्स्यसंपदेचे संवर्धन, समुद्री प्रदूषणावर नियंत्रण आणि शाश्वत मत्स्योत्पादनासाठी संबंधित राज्यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे संशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

Comments are closed.