लग्नसराईमुळं खरेदीला जोर, सोन्याच्या दरात नववर्षात 11 हजारांची वाढ, चांदीच्या दरातही जोरदार तेज

मुंबई : भारतात सोने आणि चांदीच्या दरात नववर्षात मोठी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी देखील मोठी वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीत एक तोळे सोन्याचे दर 90750 रुपये इतके झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर 1 लाख 2 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. नववर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून  17 मार्चपर्यंतचा विचार केल्यास सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नववर्षात सोने 11360 रुपयानं वाढलं आहे.

1 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये इतका होता.  17 मार्चचा सोन्याचा दर 90750 रुपये आहे. म्हणजेच सोन्याचा दर 11360 रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या दरात अडीच महिन्यात 14.31 टक्के वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ

अखिल भारतीय सर्राफा संघच्या माहितीनुसार सलग चार दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. काल सोन्याचे दर 1300  रुपयांची वाढ होत ते 90750 रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात देखील 1300 रुपयांची वाढ झाली. चांदीचे दर काल 102500 रुपयांवर पोहोचले आहेत. केंद्रीय बँकांकडून करण्यात येत असलेली सोन्याची खरेदी आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळं सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

तेजीची कारण कोणती?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर जागतिक बाजारातील अस्थिरता वाढली आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.शेअर बाजारातील घसरणीमुळं आणि अस्थिरतेमुळं गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित पर्याय म्हणून सोने  खरेदीला प्राधान्य देण्याचा ट्रेंड वाढला. यामुळं गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2998.90 डॉलर प्रति औंस झाले आहेत. कॉमेक्स सोन्याचे दर 3007 डॉलर प्रति औंसच्या पुढं गेले.

सोन्यात गुंतवणूक वाढवावी का?

नववर्षात सोन्याच्या दरात 11360 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करावी, असं वाटू शकतं. सोन्यातील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही आकडेवारी पाहिली पाहिजे.  सोन्यानं गेल्या तीन वर्षात 17 टक्के रिटर्न दिला आहे. तर, सेन्सेक्सनं 11 टक्के रिटर्न दिला आहे.

जागतिक बाजारातील तणावाची स्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढती कमजोरी, महागाई यामुळं सोन्याची मागणी वाढली आहे. अनेक देशांच्या केंद्रीय बँका अमेरिकन बाँडऐवजी सोन्याची खरेदी करत आहेत. सोन्याशी संबंधित म्युच्युअल फंडमध्ये देखील वाढ झाली आहे.  काही तज्ज्ञांच्या मते सोने दरातील तेजी फार दिव चालणार नाही. बाजार स्थिर झाले अन् महागाई नियंत्रणात आल्यास सोन्याच्या दरात घसरण होईल.

इतर बातम्या :

घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.