सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 22-24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

Gold Price Today नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणामुळं सोन्याच्या  दरात तेजी दिसून येत आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध, अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना केलेली अटक, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले असून ते सोन्यात पुन्हा गुंतवणूक करत आहेत. सोने आणि चांदीचे दर वाढलेले पाहायला मिळतात. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर  144160 रुपये प्रति तोळा इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर  132160 रुपये प्रति तोळा इतका आहे. साधारणपणे  24 कॅरेट सोन्याची खरेदी गुंतवणूक म्हणून केली जाते. तर 22 कॅरेट आणि  18 कॅरेट सोन्याचा वापर दागिने तयार करण्यासाठी केला जातो.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईचेन्नई, कोलकाता, हैदराबादमध्ये  24 कॅरेट सोन्याचा दर 144010 रुपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 132010 रुपये प्रति तोळा आहे. अहमदाबाद, जयपूर, भोपाळ, लखनौ, चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 144160 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 132160 रुपये आहे.

तज्ज्ञांच्या मते जोपर्यं आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव आहे तोपर्यंत सोन्याचे दर वाढत राहणार आहेत.

सोन्याचा दर कसा ठरतो?

सोने आणि चांदीचे दर दररोज निश्चित होतात. सोन्याच्या दरातील तेजी आणि घसरणीमागं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होतात. यामुळं डॉलर- रुपया विनिमय दरातील बदलाचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो. डॉलर मजबूत झाला तर रुपया कमजोर होतो आणि भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढतात.

भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक कर याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. करात बदल झाला असल्यास सोने आणि चांदीचे दर वर किंवा खाली होतात. जागतिक स्तरावर युद्ध, भू राजनैतिक तणाव, आर्थिक मंदी किंवा व्याज दरातील बदलांचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. जेव्हा बाजारात अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतणूकदार भांडवली बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतात. भारतात सोन्याला फक्त गुंतवणूक म्हणून नाही तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. लग्नसराई, सण आणि शुभकार्या प्रसंगी सोन्याची मागणी वाढते.

महागाईच्या काळात सोनं दीर्घकाळापासून सुरक्षित पर्याय म्हणून मानला जातो. जेव्हा महागाई वाढते, शेअर बाजारात अस्थिरता असते. तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.